(मुंबई)
कोकणातील पर्यटन आणि दळणवळणासाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चीपी विमानतळाला नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाकडून (DGCA) मोठी दिलासादायक मंजुरी मिळाली आहे. या मंजुरीमुळे आता या विमानतळावर दिवसासह रात्री आणि प्रतिकूल हवामानातही विमानसेवा सुरू ठेवता येणार असून, 24 तास विमानांची ये-जा शक्य होणार आहे. याचा थेट फायदा पर्यटकांसह स्थानिक नागरिकांना होणार आहे.
DGCA ने चीपी (सिंधुदुर्ग) विमानतळाला ऑल वेदर ऑपरेशन्स आणि IFR (Instrument Flight Rules) ची अधिकृत परवानगी दिली आहे. त्यामुळे नाईट लँडिंगची सुविधा सुरू झाली असून, खराब हवामानामुळे विमानसेवा रद्द करण्याची गरज राहणार नाही. कोकणातील एकमेव विमानतळ असलेल्या चीपी विमानतळासाठी हा मोठा टप्पा मानला जात आहे.
विमानतळ सुरू होऊन तब्बल पाच वर्षांनंतर ही महत्त्वाची मंजुरी मिळाली आहे. DGCA कडून अलीकडेच आवश्यक तांत्रिक तपासणी पूर्ण झाल्यानंतर ही परवानगी देण्यात आली. या प्रक्रियेसाठी केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि आमदार नितेश राणे यांनी सातत्याने पाठपुरावा केला. पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्यासोबत समन्वय साधत तांत्रिक अडचणी दूर करण्यात आल्या. विमानतळ प्रशासन आणि DGCA अधिकाऱ्यांनीही या कामात महत्त्वाची भूमिका बजावली.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बदलत्या हवामानामुळे आतापर्यंत येथे केवळ दिवसा विमानसेवा उपलब्ध होती. रात्री किंवा खराब हवामानात सेवा बंद राहायची, त्यामुळे पर्यटक आणि व्यावसायिक प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागत होता. नाईट लँडिंग आणि ऑल वेदर मंजुरीमुळे ही समस्या आता कायमची सुटणार आहे.
IFR परवानगीनंतर विमानतळावर आवश्यक प्रकाशयोजना, नेव्हिगेशन सिस्टीम आणि इतर तांत्रिक सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. रात्रीच्या वेळेत अखंडित वीजपुरवठ्याची व्यवस्था करण्यात आली असून, पार्किंग क्षमताही वाढवण्यात आली आहे. आता तीनऐवजी सहा विमाने एकाच वेळी पार्क करता येणार आहेत.
डिसेंबर महिन्यात पर्यटन हंगामात सिंधुदुर्ग विमानतळावर सुमारे ११ हजार प्रवाशांची नोंद झाली होती. या कामगिरीमुळे देशातील ७५ प्रमुख विमानतळांमध्ये चीपी विमानतळाचा समावेश झाला आहे. आता मुंबई–सिंधुदुर्ग थेट विमानसेवा नियमित होण्याची शक्यता असून, यामुळे पर्यटन, व्यवसाय, रोजगार आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळणार आहे.
नाईट लँडिंग आणि ऑल वेदर ऑपरेशनची मंजुरी ही सिंधुदुर्गसह संपूर्ण कोकणासाठी एक ऐतिहासिक आणि मैलाचा दगड ठरणारी घडामोड मानली जात आहे.

