(मुंबई)
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने मुंबई महापालिका निवडणुकीसाठी अनेक आमदार, खासदार आणि माजी नेत्यांच्या नातलगांना उमेदवारी दिल्याचे स्पष्ट झाले आहे. विशेष म्हणजे, घराणेशाहीच्या मुद्द्यावरून सातत्याने शिवसेना (उबाठा) पक्षावर टीका करणाऱ्या शिंदे गटाने उमेदवारी देताना मात्र घराणेशाहीलाच प्राधान्य दिल्याचे चित्र समोर आले आहे.
मुंबईतील किमान आठ आमदार आणि खासदारांच्या कुटुंबीयांना थेट उमेदवारी देण्यात आली असून, शिंदे यांनी आपल्याला साथ देणाऱ्या माजी नगरसेवकांवरही विश्वास टाकला आहे. मात्र, घराणेशाहीविरोधी भूमिकेतील ही विसंगती आता राजकीय चर्चेचा विषय ठरली आहे.
माजी खासदार राहुल शेवाळे यांची भावजय वैशाली शेवाळे यांना प्रभाग क्रमांक १८३ मधून उमेदवारी देण्यात आली आहे. माजी आमदार सदा सरवणकर यांचा मुलगा समाधान सरवणकर (प्रभाग १९४) आणि मुलगी प्रिया सरवणकर (प्रभाग १९१) यांनाही तिकीट देण्यात आले आहे. कुर्ल्याचे आमदार मंगेश कुडाळकर यांचे चिरंजीव जय कुडाळकर यांना प्रभाग १६९ मधून, तर चांदिवलीचे आमदार दिलीप लांडे यांच्या पत्नी शैला लांडे यांना प्रभाग १६३ मधून उमेदवारी मिळाली आहे.
चेंबूरचे आमदार तुकाराम काते यांनी आपल्या कुटुंबातील तन्वी काते आणि समृद्धी काते यांना उमेदवारी दिली आहे. भांडुपचे आमदार अशोक पाटील यांचा मुलगा रूपेश पाटील यांना प्रभाग ११३, तर खासदार रवींद्र वायकर यांची कन्या दिप्ती वायकर हिला प्रभाग ७३ मधून तिकीट देण्यात आले आहे.
याशिवाय, शिवसेनेने माजी आमदार यामिनी जाधव यांना प्रभाग २०९ मधून उमेदवारी दिली आहे. दिवंगत माजी आमदार श्रीकांत सरमळकर यांच्या सून पल्लवी सरमळकर यांना प्रभाग ९४ मधून तिकीट देण्यात आले आहे. तसेच माजी नगरसेवक संध्या विपुल दोषी, राजू पेडणेकर, राजुल पटेल, सुवर्णा करंजे, संजय तुरडे, तृप्ती विश्वासराव, अमेय घोळे, अनिल कोकीळ, नाना अंबोले यांनाही उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. माजी आमदार मंगेश सातमकर आणि दीपकबाबा हांडे यांच्या कुटुंबांनाही तिकीट देण्यात आले आहे.
दरम्यान, मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेना (शिंदे गट) आणि भाजप यांच्यात युती झाली असून, त्यानुसार भाजप १३७ जागा, तर शिंदे गट ९० जागांवर निवडणूक लढवत आहे. मात्र, प्रभाग क्रमांक २२५ मध्ये युतीत तिढा निर्माण झाला आहे. या प्रभागात भाजपकडून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भावजय हर्षिता नार्वेकर, तर शिंदे गटाकडून सुजाता सानप यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
शुक्रवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत असल्याने या प्रभागात युतीचा अधिकृत उमेदवार कोण, हे आज स्पष्ट होणार आहे. मात्र, एकूणच शिंदे गटाच्या उमेदवारी यादीमुळे घराणेशाहीविरोधी भूमिकेवर आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

