( मुंबई )
कोकणची पारंपरिक आणि वैभवशाली लोककला असलेल्या दशावतार कलाकारांसाठी राज्य सरकारने मोठा दिलासा दिला आहे. विधानसभेत कुडाळ-मालवणचे आमदार निलेश राणे यांनी दशावतार कलाकारांच्या प्रलंबित मागण्या आणि प्रशासकीय दिरंगाईचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी महत्त्वाच्या घोषणा केल्या. यामध्ये दशावतारसह सहा लोककलांसाठीचे वार्षिक अनुदान 2 कोटी 22 लाख रुपयांवरून वाढवून 4 कोटी 40 लाख रुपये करण्यात येणार असून, कलाकारांच्या बँक खात्यात थेट अनुदान जमा करण्याची व्यवस्थाही लागू करण्यात येणार आहे.
निलेश राणेंनी विधानसभेत मांडल्या कलाकारांच्या व्यथा
लक्षवेधी सूचनेद्वारे बोलताना आमदार निलेश राणे यांनी सांगितले की, 26 मे 2025 रोजी दशावतार कलाकारांच्या ओळखपत्र, अनुदान आणि इतर मागण्यांबाबत सांस्कृतिक मंत्र्यांसोबत बैठक झाली होती. मात्र, एक वर्ष उलटूनही त्या बैठकीतील निर्णयांची अंमलबजावणी झाली नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. लावणी कलाकारांना मिळणाऱ्या अनेक सुविधा दशावतार कलाकारांना मिळत नसल्याकडे लक्ष वेधत त्यांनी केवळ 5 हजार रुपयांच्या मानधनावर कलाकारांना समाधान मानावे लागत असल्याची टीका केली.
‘गुगल फॉर्म’ऐवजी जिल्ह्यात कॅम्प भरवा
प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर टीका करत निलेश राणे म्हणाले की, ग्रामीण भागातील कलाकारांना ‘गुगल फॉर्म’ भरायला सांगणे हा अन्याय आहे. “अधिकाऱ्यांनी स्वतः जिल्ह्यात जाऊन कॅम्प आयोजित करावेत, कलाकारांना एकत्र बोलवून त्यांची नोंदणी करावी. गावागावात राहणाऱ्या कलाकारांकडून ऑनलाइन प्रक्रिया पूर्ण होण्याची अपेक्षा ठेवणे व्यवहार्य नाही,” असे त्यांनी स्पष्ट केले.
‘दशावतार कलाकारांना आजवर मोठे पुरस्कार का नाहीत?’
राणे यांनी सरकारला सवाल करताना म्हटले की, लावणी कलाकारांना महाराष्ट्र भूषण आणि पद्म पुरस्कारांसारखे सन्मान मिळतात. मात्र, कोकणच्या सांस्कृतिक ओळखीचे प्रतीक असलेल्या दशावतार कलाकारांना आजपर्यंत अशा मोठ्या पुरस्कारांपासून वंचित का ठेवण्यात आले? रत्नागिरीतील ‘नमन’ या लोककलाकडेही शासनाचे दुर्लक्ष होत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
अनुदान थेट कलाकारांच्या खात्यात
या चर्चेला उत्तर देताना सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी सांगितले की, दशावतार कलाकारांनी कोकणची सांस्कृतिक परंपरा जिवंत ठेवली आहे. सरकारने 12 ऑगस्ट 2025 रोजी राज्यस्तरीय समितीची स्थापना केली होती. मात्र, प्रशासकीय स्तरावर झालेल्या दिरंगाईमुळे निर्णयांची अंमलबजावणी रखडली. या प्रकरणाची चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले. याचबरोबर दशावतार, तमाशा, खडी गंमत, शाहिरी, संगीत बारी आणि हंगामी तमाशा या लोककलांसाठीचे एकूण अनुदान 2.22 कोटी रुपयांवरून 4.40 कोटी रुपये करण्यात येणार असल्याची घोषणा त्यांनी केली.
50 टक्के अनुदान थेट कलाकारांच्या बँक खात्यात
वाढीव निधीपैकी 50 टक्के रक्कम थेट कलाकार, वादक आणि नेपथ्यकारांच्या बँक खात्यात जमा केली जाईल, तर उर्वरित 50 टक्के निधी कलापथक प्रमुखांना साहित्य आणि व्यवस्थापनासाठी दिला जाईल. या संदर्भातील शासन निर्णय (GR) पुढील 15 दिवसांत जारी करण्यात येणार असल्याची माहितीही मंत्र्यांनी दिली.
महिनाभरात ओळखपत्र, जिल्हानिहाय कॅम्प
गुगल फॉर्मची प्रक्रिया बंद करून पुढील महिनाभरात विभागीय अधिकारी प्रत्येक जिल्ह्यात प्रत्यक्ष कॅम्प घेऊन कलाकारांची नोंदणी करतील आणि त्यांना अधिकृत ओळखपत्रे वितरित केली जातील, अशी घोषणाही आशिष शेलार यांनी केली.
राज्य पुरस्कारांमध्येही होणार समावेश
दशावतार कलाकारांना अधिक सन्मान मिळावा यासाठी 3 लाख रुपयांच्या राज्य सांस्कृतिक पुरस्कार आणि 1 लाख रुपयांच्या युवा सांस्कृतिक पुरस्कारासाठी दशावतार कलाकारांचा समावेश करण्याबाबत संबंधित समितीला सूचना देण्यात येणार असल्याचेही शेलार यांनी विधानसभेत जाहीर केले. सरकारच्या या निर्णयामुळे कोकणातील हजारो दशावतार कलाकार, वादक आणि लोककलावंतांना आर्थिक आणि सामाजिक बळ मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

