(रत्नागिरी / प्रतिनिधी)
धावपळीच्या जीवनात आरोग्याकडे दुर्लक्ष होत असतानाच, आयुष्य किती क्षणभंगुर आहे याची जाणीव करून देणारी हृदयद्रावक घटना दापोली तालुक्यात घडली. रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या दाभोळ शाखेचे व्यवस्थापक असलेल्या ४९ वर्षीय बँक अधिकाऱ्याचा ड्युटीवर जात असतानाच चक्कर येऊन मृत्यू झाला. चंद्रशेखर महादेव गराटे असे मृत्यू झालेल्या अधिकाऱ्याचे नाव आहे.
चंद्रशेखर गराटे हे मुळचे चिपळूण तालुक्यातील खेर्डी येथील रहिवासी होते. नेहमीप्रमाणे ते गुहागर–शृंगारतळी मार्गे दाभोळ फेरीबोटीतून बँकेच्या कामासाठी प्रवास करत होते. या प्रवासादरम्यान फेरीबोटीत असतानाच त्यांना अचानक चक्कर आली. सहप्रवाशांनी तत्काळ मदत करून त्यांना दाभोळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. मात्र, तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. ही घटना सोमवारी (दि. २९) सकाळी दहा ते साडेअकरा वाजण्याच्या सुमारास घडली.
गराटे यांच्या आकस्मिक निधनाने गराटे कुटुंबावर दुःखाचा मोठा आघात झाला आहे. त्यांच्या पश्चात माध्यमिक शिक्षिका असलेली पत्नी, एक मुलगी, आई-वडील, भाऊ व भावजय असा परिवार आहे. चार महिन्यांपूर्वीच त्यांची रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या दापोली तालुक्यातील दाभोळ शाखेत बदली झाली होती. त्यानंतर ते तेथे व्यवस्थापक म्हणून कार्यरत होते.
मनमिळावू स्वभाव, सहकार्याची वृत्ती आणि कर्तव्यनिष्ठा यासाठी गराटे परिचित होते. त्यांच्या निधनाबद्दल रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाने, व्यवस्थापनाने आणि कर्मचाऱ्यांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे. या घटनेची नोंद दाभोळ सागरी पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास दाभोळ पोलीस करत आहेत.

