(रत्नागिरी / प्रतिनिधी)
तालुक्यातील हातखंबा–झरेवाडी येथील एका प्रौढाने विषारी औषध प्राशन केल्याची दुर्दैवी घटना उघडकीस आली आहे. उपचारासाठी दाखल करण्यात आलेल्या या प्रौढाचा जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असतानाच मृत्यू झाला. प्रकाश पांडूरंग गोताड (वय ५५, रा. हातखंबा–झरेवाडी, गोताडवाडी) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, प्रकाश गोताड यांना मद्याचे व्यसन होते. गुरुवारी (ता. २५) सकाळी सुमारे अकराच्या सुमारास त्यांनी कोणतेतरी विषारी औषध प्राशन केल्याचा संशय आहे. त्यानंतर ते घराच्या अंगणात बेशुद्ध अवस्थेत आढळून आले. त्यांच्या तोंडातून पांढरट रंगाचा फेस येत असल्याचे नातेवाईकांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी तात्काळ उपचारासाठी त्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले.
रुग्णालयात उपचार सुरू असतानाच सोमवारी (ता. २९) सायंकाळी सहाच्या सुमारास वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले. या प्रकरणी ग्रामीण पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे.

