(रत्नागिरी / प्रतिनिधी)
समाजातील वंचित घटकांतील विद्यार्थ्यांच्या कल्याणासाठी उभारलेल्या शासकीय वसतिगृहांमध्येच जर मूलभूत सुविधा नाकारल्या जात असतील, तर हा केवळ निष्काळजीपणा नव्हे, तर प्रशासकीय अपयशाचा जिवंत पुरावा ठरतो. रत्नागिरी येथील कुवारबाव परिसरातील १०० विद्यार्थ्यांचे शासकीय वसतिगृह याचे ठळक उदाहरण ठरत आहे. गेल्या २ ते ३ वर्षांपासून वसतिगृहातील विद्यार्थी सातत्याने तक्रारी, निवेदने व पत्रव्यवहार करत असताना समाजकल्याण विभाग आणि विशेषतः सहाय्यक आयुक्त दिपक घाटे यांच्याकडून मात्र केवळ मौन आणि दुर्लक्षाची भूमिका घेतली जात असल्याचे दिसून येत आहे.
सध्या थंडीचा कडाका वाढलेला असताना वसतिगृहातील विद्यार्थ्यांना थंड पाण्याने अंघोळ करण्यास भाग पाडले जात आहे. गरम पाण्याची कोणतीही सुविधा नसल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांची प्रकृती बिघडत असून सर्दी, ताप, अंगदुखी यासारख्या आजारांनी डोके वर काढले आहे. ही बाब वारंवार कळवूनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही, हे विशेष आहे. स्वच्छतेचा बोजवारा, ठेकेदारावर कारवाई नाही. वसतिगृह व परिसराची स्वच्छता करण्याची जबाबदारी असलेल्या क्रिस्टल कंपनीकडून नियमित स्वच्छता होत नसल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. गृहपालांनी संबंधित कंपनीच्या व्यवस्थापकांना वारंवार सूचित करूनही या गंभीर बाबीकडे सर्रास दुर्लक्ष करण्यात आले. तरीही, सहाय्यक आयुक्त यांनी अद्याप कारवाई का केली नाही? असा थेट सवाल उपस्थित होत आहे.
या संपूर्ण प्रकरणात विद्यार्थ्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, गृहपालांविरोधात कोणतीही तक्रार नाही. उलटपक्षी, गृहपाल सातत्याने वरिष्ठ स्तरावर पत्रव्यवहार करून पाठपुरावा करत असून काही वेळा विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी स्वतःच्या खिशातून पैसे खर्च करत असल्याचेही विद्यार्थ्यांनी आवर्जून सांगितले. मात्र वरच्या पातळीवरील अधिकारी निष्क्रियतेचा कळस का गाठत आहेत? सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, एखादा विद्यार्थी समस्या मांडल्यास असल्यास त्याला ‘टार्गेट’ केले जाते, असा गंभीर आरोप विद्यार्थ्यांकडून होत आहे. मात्र, कोण टार्गेट करत आहे, असे विचारले असता विद्यार्थ्यांनी नाव सांगण्यास नकार दिला. ही दहशत नेमकी कोणाची? अधिकारीच विद्यार्थ्यांना गप्प बसवण्यासाठी दबाव टाकत असतील, तर हा प्रकार अत्यंत चिंताजनक असून लोकशाही मूल्यांना काळिमा फासणारा आहे.
जबाबदारी कोणाची?
गरम पाण्याची सुविधा, स्वच्छता आणि आरोग्य या मूलभूत गरजांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष झाल्यास भविष्यात कोणतीही अप्रिय घटना घडल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी समाजकल्याण विभाग व संबंधित अधिकाऱ्यांवर राहील, असा इशारा विद्यार्थ्यांनी निवेदनातून दिला आहे. विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळणाऱ्या या उदासीनतेवर समाजकल्याण विभाग कधी जागा होणार? की तक्रारींच्या कागदांवरच विद्यार्थ्यांचे आरोग्य गाडले जाणार? हा संतप्त सवाल आता उपस्थित होत आहेत.

