(रत्नागिरी /प्रतिनिधी)
विक्रीसाठी गावठी हातभट्टीची दारू बाळगणाऱ्या एकासह सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन करून धुंद अवस्थेत आढळलेल्या चौघांविरोधात रत्नागिरी आणि राजापूर पोलिसांनी कारवाई केली. या दोन्ही कारवायांमध्ये एकूण पाच जणांविरोधात दारूबंदी कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
रत्नागिरी तालुक्यातील जाकादेवी ते ओरी जाणाऱ्या मार्गालगतच्या जंगलमय परिसरात विक्रीच्या उद्देशाने गावठी हातभट्टीची दारू बाळगल्याप्रकरणी सुरेश बाळू गोताड (५०, रा. चाफे, मधलीवाडी, जाकादेवी) याच्याविरोधात ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ३० सप्टेंबर रोजी दुपारी १२.१७ वाजण्याच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस हेडकॉन्स्टेबल भैरवनाथ सवाईराम यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, गोताड हा जाकादेवी-ओरी रस्त्यालगतच्या जंगलमय भागात २५ लिटर गावठी हातभट्टीची दारू, अंदाजे २ हजार ७०५ रुपये किमतीची, विक्रीसाठी बाळगून असल्याचे आढळून आले. याप्रकरणी ग्रामीण पोलिसांनी पुढील कायदेशीर कारवाई सुरू केली आहे.
दरम्यान, राजापूर तालुक्यातील खरवते येथे मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गालगत सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन करून धुंद अवस्थेत आढळलेल्या चौघांविरोधात राजापूर पोलिसांनी कारवाई केली. ३० सप्टेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, महामार्गाच्या शेजारी सार्वजनिक ठिकाणी काही व्यक्ती मद्यप्राशन करून धुंद अवस्थेत आढळून आल्या. त्यानंतर पोलिसांनी चौघांविरोधात स्वतंत्र गुन्हे दाखल केले.
यामध्ये अमर भगवान साळुंके (४७), सागर विजय गवळी (३६), रोशन पोपट गायकवाड (२५) आणि संतोष पुंडलिक पानसरे (४७) यांचा समावेश आहे. चौघेही बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर येथील रहिवासी असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. या प्रकरणांत अनुक्रमे रात्री ८.५५, ९.१७, ९.३८ आणि ९.५५ वाजता गुन्हे दाखल करण्यात आले. सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन केल्याप्रकरणी दारूबंदी कायद्यानुसार पोलिसांनी ही कारवाई केली आहे.


