(पुणे)
पुणे जिल्ह्यातील राजगड, पानशेत तसेच पश्चिम हवेली–सिंहगड या डोंगराळ व वनसंपन्न परिसरात वन्यप्राण्यांच्या शिकारीचे प्रकार पुन्हा एकदा समोर आले आहेत. पानशेत रस्त्यालगत असलेल्या राजगड तालुक्यातील ओसाडे परिसरात दुर्मीळ चौसिंगा हरणाची बंदुकीने गोळ्या घालून निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी राजगड वन विभागाने चार शिकाऱ्यांना रंगेहाथ अटक केली आहे.
विशेष म्हणजे, शिकारीनंतर हरणाच्या मांसाची वाटणी सुरू असतानाच वन विभागाच्या पथकाने छापा टाकत आरोपींना ताब्यात घेतले. नववर्षाच्या सुरुवातीलाच पर्यटकांची मोठी वर्दळ असलेल्या पानशेत–सिंहगड परिसरात हा धक्कादायक प्रकार घडल्याने नागरिक व पर्यावरणप्रेमींमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
कशी उघडकीस आली शिकार?
रविवारी (दि. 28) दुपारी सुमारे चार वाजता राजगड वन विभागाचे वनरक्षक राजेंद्र निंबोरे हे नियमित गस्तीवर असताना ओसाडे परिसरात संशयास्पद हालचाली आढळून आल्या. तपासादरम्यान चौसिंगा हरणाची गोळ्या घालून हत्या केल्याचे स्पष्ट झाले. घटनास्थळी हरणाचे मांस, रक्ताचे डाग, शस्त्रसामग्री आढळून आल्याने गुन्हा उघड झाला.
समीर वसंत पिलाणे (36) – रा. ओसाडे, गणेश बबनराव लोहकरे (38) – रा. ओसाडे, नवनाथ चंद्रकांत पवळे (40) – रा. सोनापूर, ता. हवेली, पांडुरंग दत्तात्रय कदम (47) – रा. निगडे मोसे, ता. राजगड अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. आरोपींकडून शिकारीसाठी वापरण्यात आलेली बंदूक व अन्य हत्यारे वन विभागाने जप्त केली आहेत.
चौसिंगा हरणाची शिकार गंभीर गुन्हा
प्राथमिक तपासात आरोपींनी सरकारी वनक्षेत्रालगतच्या खासगी जंगलात दबा धरून शिकार केल्याचे समोर आले आहे. चौसिंगा हा अत्यंत दुर्मीळ व संरक्षित वन्यप्राणी असून त्याची शिकार जैवविविधतेस गंभीर धोका निर्माण करते, असे वन्यजीव तज्ज्ञांचे मत आहे. या प्रकरणी वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, राजगडचे वनपरिक्षेत्र अधिकारी अनिल लांडगे पुढील तपास करीत आहेत. दोषी आढळल्यास 7 वर्षांपर्यंत कारावास व किमान 25 हजार रुपये दंडाची तरतूद आहे.
घटनेनंतर उपवनसंरक्षक महादेव मोहिते आणि सहाय्यक वनसंरक्षक शीतल राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली वन विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पंचनामे, जप्ती व परिसर तपासाची कारवाई करण्यात आली. दरम्यान, यापूर्वीही राजगड, पानशेत, सिंहगड व पश्चिम हवेली परिसरात या किंवा अन्य टोळ्यांनी शिकार केली आहे का, याचा सखोल तपास सुरू आहे. आरोपींकडील बंदुकीचा परवाना वैध आहे का, तसेच इतर सहकारी सहभागी आहेत का, याचाही शोध घेतला जात आहे.
वन विभागाने आगामी काळात गस्त वाढवण्याचा व शिकाऱ्यांविरोधात शून्य सहनशीलतेची भूमिका घेण्याचा इशारा दिला आहे. नागरिकांनी संशयास्पद हालचाली तात्काळ वन विभागाला कळवाव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे.

