( नाशिक )
शहरासह जिल्ह्यात बिबट्यांची वाढती संख्या आणि त्यांच्या मानवी वस्तीकडे वाढणाऱ्या हालचालींमुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. दिंडोरी तालुक्यात गेल्या आठ महिन्यांत बिबट्याच्या हल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, तर सहा जण जखमी झाले आहेत. परिणामी शेतीकामासाठी मजूर मिळेनासे झाले असून शेतकरी हवालदिल झाले आहेत.
दिंडोरी तालुक्यातील लखमापूर, मोहाडी, खेडगाव आणि वानरवाडी परिसरात बिबट्यांचा वावर गेल्या काही महिन्यांपासून चांगलाच वाढला आहे. शिकारीच्या शोधात बिबटे वनक्षेत्र सोडून गावांच्या सीमेकडे सरकत असून त्यांच्याकडून मानवांवर हल्ले होत आहेत. केवळ दोन महिन्यांत पाच जनावरांचे बिबट्यांनी बळी घेतले आहेत. त्यामुळे ग्रामीण भागात भीतीचे वातावरण पसरले आहे. रहिवाशांचा सुरक्षेबाबत वनविभागाने त्वरित ठोस उपाययोजना करावी, अशी मागणी सातत्याने होत आहे.
उसाच्या शेतीत बिबट्यांना मिळतो ‘नैसर्गिक निवारा’
दिंडोरी तालुक्यात द्राक्षबागांसोबत मोठ्या प्रमाणावर ऊस शेती आहे. सिंचन सुविधांमुळे उसाचे क्षेत्र झपाट्याने वाढत असून या दाट पिकामध्ये बिबट्यांना सुरक्षित आश्रय, सावली आणि पाण्याची उपलब्धता सहज मिळते. तसेच गावातील पाळीव जनावरेही त्यांच्यासाठी सहज उपलब्ध शिकारी ठरतात. सध्या ऊसतोडीचा हंगाम सुरू असल्याने उसातून बाहेर पडणारे बिबटे सरळ मानवी वस्तीकडे वळत असल्याचे चित्र आहे. स्थानिक नागरिकांनी सांगितले, तीन जणांचा बळी गेल्यानंतरही प्रशासन ढिम्म आहे. वनविभागाने गस्त वाढवून पिंजरे वाढवावेत आणि बिबट्यांचे पकडमोहीम राबवावी. लोकांचा संयम संपत चालला आहे.
या वर्षात बिबट्याच्या हल्ल्यात जिल्ह्यामध्ये मृत्यू पावलेले नागरिक
- 25 एप्रिल 2025 : पायल राजेंद्र चव्हाण (वय 20), वानरवाडी
- 31 मे 2025 : रुद्र अमोल जाधव (वय 9), जाधव वस्ती, दिंडोरी
- 9 ऑगस्ट 2025 : जनाबाई जगन बदादे (वय 65), दिंडोरी
बिबट्यांसोबत सहअस्तित्वासाठी नागरिकांनी घ्यावयाची काळजी
- परिसर स्वच्छ ठेवा; कचरा टाळा.
- अंधारात एकटे जाऊ नका; सोबत कोणाला घ्या.
- घराभोवती झुडपे, उंच गवत काढून टाका.
- अंगणात व वाटांवर पुरेसा प्रकाश ठेवा.
- मुलांनी गटाने प्रवास करावा; एकटे पाठवू नका.
- पाळीव जनावरे रात्री सुरक्षित ठिकाणी बांधा.
बिबट्या समोर आल्यास काय करावे?
अचानक तुमच्या समोर बिबट्या आला तर सगळ्यात पहिल्यांदा आहेत त्या जागेवर स्थिर उभे राहावे. त्याच्याकडे सावधरीतीने बघा. त्याच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करू नका, अशावेळी बिबट्या स्वतःच रक्षण करण्यासाठी अटॅक करू शकतो. जागेवर स्थिर आणि सावध असालतर बिबट्या लगेच अटॅक करत नाही. आपल्या शरीराची जास्त हालचाल करु नका. बिबट्या गुरगुर आवाज करून तुम्हाला घाबरवण्याचा प्रयत्न करेल, मात्र तुम्ही एका जागेवर शांत आणि सावध उभे राहा.
- बिबट्याला त्याचा मार्ग मोकळा द्या; शांतपणे मागे सरका.
- त्याच्याकडे तोंड करून हळूहळू दूर व्हा.
- त्वरित इतरांना सतर्क करा, आवाज करू नका आणि मुलांना/जनावरांना घरात बंद करा.
- घराला जितकं मोठ कंपाऊंड करता येईल तितकं करा.
- आपल्या घरापासून 20 ते 25 फूट अंतरावर पिकांची लागवड करणे, जवळ लागवड करू नये. शेतात,घराजवळ पुरेसा उजेड ठेवणे.
- घराच्या बाहेर पाळीव कुत्रे बांधून ठेवू नये, कुत्र्याच्या वासाने बिबट्या घराकडे येतो. मोकळे कुत्रे प्रतिकार करू शकतात. मात्र, बांधलेले कुत्रे प्रतिकार करत नाही. त्याला शिकार करणे सहज सोपे होते. जनावरे गोठ्यात बंधिस्त ठेवावी.
- शेतात लहान मुलांना घेऊन जाऊ नये. बाहेर जाताना हातात काठी ठेवावी. काठीला घुंगरू बांधावे. जेणेकरून बिबट्या आवाजाने पळून जाऊ शकतो.

