(रत्नागिरी / प्रतिनिधी)
कुर्धे-मेर्वी येथे विहिरीत पडलेल्या रानडुकराला वनविभागाच्या पथकाने सुरक्षितरीत्या बाहेर काढत जीवदान दिले. प्राथमिक वैद्यकीय तपासणीत रानडुक्कर सुस्थितीत असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्याला नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात आले. आज मंगळवारी (२७ ऑक्टोबर) ही कार्यवाही करण्यात आली.
कुर्धे-मेर्वी येथील शुभदा महेश पाध्ये यांच्या मालकीच्या विहिरीत रानडुक्कर पडल्याची माहिती गावखडी येथील कासवमित्र प्रदीप डिंगणकर यांनी वनविभागाला दिली. माहिती मिळताच वनविभागाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. त्या वेळी रानडुक्कर विहिरीतील पाण्यात पोहत असल्याचे आढळले. विहिरीची गोलाई सुमारे १५ फूट, खोली ४५ फूट आणि पाण्याची पातळी १५ फूट असल्याचे पाहणीत स्पष्ट झाले. परिस्थितीचा अंदाज घेऊन वनविभागाच्या पथकाने पिंजरा पाण्यात सोडला. त्यानंतर रानडुकराला सुरक्षितपणे पिंजऱ्यात जेरबंद करून विहिरीबाहेर काढण्यात आले.
त्यानंतर हरचेरी येथील पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून रानडुकराची प्राथमिक तपासणी करण्यात आली. तो सुस्थितीत असल्याचे आढळल्याने त्याला नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात आले. ही कार्यवाही विभागीय वन अधिकारी गिरीजा देसाई आणि सहाय्यक वनसंरक्षक प्रियंका लगड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. यावेळी रत्नागिरीचे परिक्षेत्र वन अधिकारी विक्रम गुरव, वनरक्षक शर्वरी कदम, महेश धोत्रे, कासवमित्र प्रदीप डिंगणकर, सर्पमित्र वरद हळबे आणि आरआरटीचे इशांत खानोलकर उपस्थित होते.


