(चिपळूण)
चिपळूण तालुक्यातील मुर्तवडे येथील सुतारवाडीमध्ये जलजीवन मिशन योजनेअंतर्गत सुरू असलेल्या नळपाणी योजनेच्या कामातील अनियमिततांबाबत जिल्हा परिषद सदस्या सौ. शिवानी संदीप सावंत यांनी लक्ष वेधताच प्रशासनाने तात्काळ दखल घेतली आहे. या पार्श्वभूमीवर चिपळूण पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी उमा भारती पाटील यांनी रविवारी प्रत्यक्ष घटनास्थळी भेट देत पाहणी केली.
यावेळी जिल्हा परिषद सदस्या सौ. शिवानी संदीप सावंत, संबंधित विभागाचे अधिकारी, ठेकेदार तसेच मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. पाहणीदरम्यान ग्रामस्थांनी जलजीवन मिशन योजनेच्या कामातील त्रुटींबाबत तसेच सुतारवाडीतील तीव्र पाणीटंचाईबाबत नाराजी व्यक्त करत सध्याची परिस्थिती अधिकाऱ्यांसमोर मांडली.
यावर गटविकास अधिकारी उमा भारती पाटील यांनी ग्रामस्थांशी संवाद साधत हा प्रश्न गांभीर्याने घेतला असल्याचे सांगितले. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी तातडीने चर्चा करून सुतारवाडीतील पाण्याचा प्रश्न लवकरात लवकर निकाली काढला जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले. तसेच या ठिकाणी तातडीने नवीन विहीर बांधण्याचे काम सुरू करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, जिल्हा परिषद सदस्या सौ. शिवानी संदीप सावंत यांनी सांगितले की, “ग्रामस्थांना शुद्ध पाणी मिळणे हा त्यांचा मूलभूत हक्क आहे. जलजीवन मिशनसारख्या महत्त्वाच्या योजनेचा लाभ प्रत्येक घरापर्यंत पोहोचला पाहिजे. प्रशासनाने तातडीने दखल घेऊन पाहणी केली ही समाधानकारक बाब आहे. मात्र सुतारवाडीतील पाणीप्रश्न कायमस्वरूपी निकाली काढण्यासाठी आवश्यक ती ठोस पावले उचलली जावीत.”

