(रत्नागिरी / चिपळूण)
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, रत्नागिरी यांनी सावर्डे पोलीस ठाणे हद्दीत धडक कारवाई करत अवैधरीत्या शस्त्रे बाळगणाऱ्या एका व्यक्तीस अटक केली आहे. या कारवाईत दोन बंदुका आणि नऊ जिवंत काडतुसे असा एकूण ७० हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, जिल्ह्यातील अवैध शस्त्रसाठ्यावर पोलिसांनी कठोर भूमिका घेतल्याचे स्पष्ट झाले आहे.
नितीन दत्तात्रय बगाटे आणि बी. बी. महामुनी यांच्या निर्देशानुसार जिल्ह्यात अवैध शस्त्र बाळगणे, वाहतूक आणि वापर रोखण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. त्याच अनुषंगाने नितीन ढेरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पथक १८ मार्च रोजी सावर्डे परिसरात गस्त घालत असताना गोपनीय माहिती प्राप्त झाली. त्यानुसार आगवे येथे एक व्यक्ती अवैध धंद्याबरोबरच शस्त्रे बाळगत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी संबंधित ठिकाणी सापळा रचून पाहणी केली असता, घराच्या मागील बाजूस गुरांच्या गोठ्यालगतच्या लाकडी खोपटीत एक व्यक्ती बंदुकीची साफसफाई करताना आढळून आला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने आपले नाव महेश महेंद्र जाधव (वय ३५, रा. आगवे, ता. चिपळूण) असे सांगितले. तपासणीदरम्यान त्याच्याकडे असलेली बंदूक सिंगल बॅरल काडतुसाची असल्याचे स्पष्ट झाले.
शस्त्र बाळगण्याबाबत परवान्याची विचारणा केली असता संबंधिताकडे कोणताही वैध परवाना नसल्याचे उघड झाले. पुढील झडतीत पोलिसांना एक सिंगल बॅरल काडतुसाची बंदूक, एक जुनी नादुरुस्त ठासणीची बंदूक आणि नऊ जिवंत काडतुसे मिळून आली. हा सर्व मुद्देमाल पंचांसमक्ष जप्त करण्यात आला. या प्रकरणी महेश जाधव याच्याविरुद्ध सावर्डे पोलीस ठाणे येथे शस्त्र अधिनियम १९५९ अंतर्गत कलम ३(१) आणि २५ अन्वये गुन्हा क्रमांक २४/२०२६ नोंदविण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस कर्मचारी विजय आंबेकर, दिपराज पाटील, विवेक रसाळ आणि अतुल कांबळे यांच्या सहभागाने करण्यात आली. जिल्ह्यातील संवेदनशील भागांमध्ये अशा कारवाया अधिक तीव्र करण्याचे संकेत पोलिसांकडून देण्यात आले आहेत.

