( चिपळूण )
पोफळी येथील महानिर्मिती विभागात ठेकेदारी पद्धतीने कार्यरत असलेल्या कामगारांचे वेतन शोषण उघड झाल्यानंतर पालकमंत्री उदय सामंत यांनी ८ ठेकेदारांना नोटिसा बजावण्याचे आदेश दिले. येत्या काही दिवसांत या प्रकरणी स्वतंत्र बैठक घेणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
शनिवारी बहादूरशेखनाका येथील सहकार भवनच्या सभागृहात जिल्हा आढावा बैठक झाली. यामध्ये महानिर्मिती, खडपोली व खेर्डी एमआयडीसी, प्रदूषण नियंत्रण मंडळ, तसेच शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा झाली. या बैठकीत १८० ठेकेदारी पद्धतीने कार्यरत कामगारांना कंपनीकडून प्रत्यक्षात मिळणाऱ्या वेतनात तफावत असल्याची तक्रार करण्यात आली.
कामगारांच्या म्हणण्यानुसार, महानिर्मितीकडून दरमहिना सुमारे २५ हजार रुपये वेतन मंजूर केले जाते. मात्र प्रत्यक्षात त्यांना केवळ ९ ते १० हजार रुपयेच मिळतात. इतकेच नव्हे, तर कामगारांची बँक पासबुकेसुद्धा ठेकेदारांकडे जमा असल्याचे समोर आले आहे. यावर संताप व्यक्त करत मंत्री सामंत यांनी अधिकाऱ्यांना जाब विचारत, ठेकेदारांविरोधात तत्काळ कारवाई करण्याचे आदेश दिले.
औद्योगिक वसाहतीतील सांडपाण्यावर कडक कारवाईचे आदेश
या बैठकीत कोंडफसवणे गावातील थ्री-फेज वीज पुरवठा, तसेच खडपोली औद्योगिक वसाहतीतील खराब रस्त्यां आणि कंपन्यांच्या सांडपाण्यामुळे होणारे प्रदूषण यावर ग्रामस्थांनी तक्रारी केल्या. त्यावर एमआयडीसीला तातडीने रस्ता दुरुस्तीचे आदेश, तर प्रदूषण नियंत्रण मंडळाला कंपन्यांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश मंत्री सामंत यांनी दिले. आपण दिलेल्या सूचनांवर पुढील आठवडाभरात काय कार्यवाही झाली, याचा आढावा मी स्वतः घेईन, असेही त्यांनी ठणकावून सांगितले.