( देवरुख / प्रतिनिधी )
देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाच्या स्व. अरुंधती अरुण पाध्ये इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज ऑफ कॉमर्स, देवरूखच्या ११व्या ‘वार्षिक आर्ट अँड क्राफ्ट एक्झिबिशन’ भरविण्यात आले होते. या प्रदर्शनाला विद्यार्थी, पालक आणि कलाप्रेमी नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. कलाशिक्षक सुरज मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या विविध चित्रे व इतर कलाकृती प्रदर्शनात मांडण्यात आल्या होत्या. बाल कलाकारांच्या या चित्रकृती पाहताना मोठ्या कलाकारांइतक्याच प्रगल्भ कलाकृती सादर केल्याची अनुभूती या प्रदर्शनाद्वारे रसिकांनी अनुभवली.
प्रदर्शनामध्ये शाळेतील विद्यार्थ्यांनी शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये वर्षभरात काढलेली विविध प्रकारची चित्रे व इतर कलाकृती मांडण्यात आल्या होत्या. यामध्ये निसर्ग चित्र, व्यक्ती चित्र(पोट्रेट), संकल्प चित्र, कोलाज, व्यंगचित्र, भीत्तीचित्र, विविध डिझाइन्स, सुलेखन (कॅलिग्राफी) इत्यादीचा समावेश होता. विद्यार्थ्यांनी वॉटर कलर, अॅक्रेलिक कलर, ऑइल कलर, ऑइल पेस्टल, रंगीत पेन्सिल व पेन, चारकोल इत्यादी माध्यमांचा सुयोग्य वापर केला होता.
प्रशालेतील इयत्ता १ ली ते १२वी पर्यंतच्या वयोगटातील मुलांनी ही चित्र रेखाटली होती. या चित्रांमध्ये सार्थक जाधव, गुंजन सार्दळ, दुर्वा खेतल, श्रिया अणेराव, दिया खामकर, वृंदा भाटकर, गार्गी खांबे, सान्वी भुरवणे, आर्या खेतल, आर्यन सावंत या विद्यार्थ्यांनी विविध विषयावर एकापेक्षा एक सरस चित्रे साकारली होती. यातून मुलाची प्रगल्भता, बुद्धिमत्ता आणि प्रतिभा दिसत असल्याची प्रतिक्रिया अनेक रसिकानी व्यक्त केली. चित्रकृतींचा नियमित अभिनव उपक्रम राबवून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना कलाशिक्षक सुरज मोहिते प्रोत्साहित करतात, अशा प्रकारचा स्तुत्य उपक्रम प्रशालेने राबविल्याबद्दल प्रदर्शनास भेट देणाऱ्या अनेक पालकांनी कलाशिक्षक सुरज मोहिते, शाळेच्या मुख्याध्यापिका सोनाली नारकर व दीक्षा खंडागळे यांचे अभिनंदन केले.
या कला प्रदर्शनाचे उद्घाटन शाळा समिती सदस्य नितीन शेडगे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी प्रशालेच्या चेअरमन ॲड. वेदा प्रभुदेसाई, सुधीर गावडे, यांच्यासह शाळेचे मुख्याध्यापक आणि सर्व शिक्षक, तसेच कलाकार विद्यार्थि आणि मार्गदर्शक कला शिक्षक सूरज मोहिते उपस्थित होते. संस्थाध्यक्ष सदानंद भागवत व ज्येष्ठ चित्रकार विष्णू परीट यांनी प्रदर्शनाला भेट देऊन विद्यार्थ्यांनी साकारलेल्या विविध कलाकृतींबाबत समाधान व्यक्त करून सर्व विद्यार्थी व शिक्षकांचे अभिनंदन केले.

