(देवरूख / वार्ताहर)
रत्नागिरी तायक्वांदो स्पोर्ट्स असोसिएशनच्या मान्यतेने तसेच संगमेश्वर तालुका तायक्वांदो ॲकॅडमी आणि नगरपंचायत देवरूख तायक्वांदो क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय तायक्वांदो स्पर्धेचे शानदार उद्घाटन माजी राज्यमंत्री रविंद्र माने आणि आमदार शेखर निकम यांच्या हस्ते उत्साहात पार पडले.
शहरातील स्वातंत्र्यवीर सावरकर चौक येथील ओमेगा गार्डन हॉलमध्ये आयोजित करण्यात आलेली ही स्पर्धा तीन दिवस चालणार असून जिल्हाभरातून सुमारे ६०० खेळाडू सहभागी होत आहेत.
उद्घाटनप्रसंगी आमदार शेखर निकम म्हणाले, “कोणताही खेळ शरीर तंदुरुस्त ठेवण्यास मदत करतो. तायक्वांदो हा केवळ फिटनेस वाढवणारा खेळ नसून स्वसंरक्षणाची प्रभावी कला आहे. या खेळाच्या विकासासाठी जे काही आवश्यक असेल ते करण्याचा आपण प्रामाणिक प्रयत्न करू. भविष्यात देवरूखमध्ये राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धा आयोजित व्हावी, यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करूया.”
माजी राज्यमंत्री रविंद्र माने यांनीही खेळातील खिलाडूवृत्तीचे महत्त्व अधोरेखित करत तायक्वांदोमुळे स्वसंरक्षणाची क्षमता विकसित होत असल्याचे सांगितले.
उपसभापती प्रफुल्ल बाईत यांनी मनोगत व्यक्त करताना तालुक्यात तायक्वांदो खेळाची चांगली परंपरा निर्माण झाली असून प्रमुख प्रशिक्षक शशांक घडशी यांच्या अथक परिश्रमामुळे अनेक खेळाडूंना प्रोत्साहन मिळत असल्याचे नमूद केले.
यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रोहन बने, सभापती शर्वरी वेल्ये, उपसभापती प्रफुल्ल बाईत, देवरूख नगराध्यक्षा मृणाल शेट्ये, आगारव्यवस्थापिका रेश्मा मधाळे, स्मिता लाड, अभिजित शेट्ये, प्रफुल्ल भुवड, बाळू ढवळे, रूपाली कदम, व्यंकटेश कररा, तालुका प्रमुख प्रशिक्षक शशांक घडशी यांच्यासह तायक्वांदोप्रेमी, प्रशिक्षक, पालक आणि मोठ्या संख्येने खेळाडू उपस्थित होते.

