( देवरुख / प्रतिनिधी )
क्रेडार संचलित,देवरुख कॉलेज ऑफ आर्ट अँड डिझाईन या कला महाविद्यालयाचा द्वितीय व चतुर्थ वर्षाचा निकाल जाहीर झाला असून,सर्व विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले व कला महाविद्यालयाचा निकाल शंभर टक्के लागला आहे. शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मुंबई विद्यापीठ अंतर्गत घेतल्या जाणाऱ्या द्वितीय वर्ष चित्रकलेच्या परीक्षेत विद्यापीठाच्या यादीत प्रथम येण्याचा मान डिकॅड ची विद्यार्थिनी कुमारी मिताली कुलकर्णी हिने पटकावला आहे तसेच चतुर्थ वर्षाचे विद्यार्थिनी निकी बाणे ही विद्यापीठ यादीत चौथ्या क्रमांकावर आली आहे.
देवरुख कॉलेज ऑफ आर्ट अँड डिझाईन येथे दहावीनंतर अप्लाईड आर्ट मध्ये शिक्षण घेण्यासाठी महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त दोन वर्षाचा पदविका अभ्यासक्रम २१-२२ पासून चालू करण्यात आला आहे त्याचाही शैक्षणिक वर्ष २४-२५ चा निकाल जाहीर झाला असून तोही शंभर टक्के लागला आहे. यामध्ये दहावीनंतर दोन वर्षाचा डिप्लोमा केला तर बारावी समतुल्य प्रमाणपत्र मिळते व त्यानंतर विद्यार्थ्यांना कोणत्याही वेगळ्या शाखेत प्रवेश घेता येतो .
मुंबई विद्यापीठाची संलग्न व कलासंचलनालयाचे मान्यता असणारे डिकॅड हे कोकणातील पहिले कला महाविद्यालय आहे २००७ मध्ये या कला महाविद्यालयाची स्थापना झाली. प्रशस्तवर्ग खोल्या अत्याधुनिक प्रिंट मेकिंग स्टुडिओ,म्युरल स्टुडिओ, कम्प्युटर लॅब विद्यार्थ्यांसाठी कला महाविद्यालयाच्याच इमारतीत वस्तीगृह सुविधा असणारे हे कला महाविद्यालय आहे.येथे प्रसिद्ध चित्रकारांचे प्रात्यक्षिके व चर्चासत्रे यांचे आयोजन होत असते,तसेच विद्यार्थ्यांसाठी चित्रकलेतील कार्यशाळांचे आयोजन केले जाते. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थाध्यक्ष अजय पित्रे व सौ.भारती पित्रे, सचिव विजय विरकर तसेच कला महाविद्यालयाचे प्राचार्य रणजित मराठे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी कौतुक केले आहे.