(खेड /प्रतिनिधी)
तालुक्यातील शिव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत कर्मचाऱ्यांनी दिलेल्या तक्रार अर्जाची अखेर जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने गंभीर दखल घेतली आहे. तक्रारीतील मुद्द्यांचा सखोल विचार करून जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे यांनी रुग्णालयातील दोन वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या कार्यक्षेत्रात तात्पुरता बदल करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, अधिकृत लेखी आदेश असूनही संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्याने अद्याप त्याची अंमलबजावणी न केल्याने प्रशासनातील शिस्तीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
शिव प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत असलेल्या १४ कर्मचाऱ्यांनी एकत्रितपणे तक्रार अर्ज सादर केला होता. या तक्रार अर्जात कार्यपद्धतीतील गैरप्रकार, मानसिक दबाव तसेच कामकाजातील अडथळ्यांचा उल्लेख करण्यात आला आहे. या प्रकारांमुळे कर्मचाऱ्यांचे मनोबल खचत असून, काही कर्मचाऱ्यांच्या मानसिक आरोग्यावरही त्याचा विपरीत परिणाम होत असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. परिणामी आरोग्यसेवांच्या गुणवत्तेवरही परिणाम होत असल्याची बाब कर्मचाऱ्यांनी अधोरेखित केली आहे.
या पार्श्वभूमीवर खेड तालुका आरोग्य अधिकारी यांनी दिलेले पत्र, कर्मचाऱ्यांचा तक्रार अर्ज व त्यावरील टिप्पण्यांच्या आधारे मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे यांनी तातडीने हस्तक्षेप करत दोन्ही वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या कार्यक्षेत्रात बदलाचे आदेश दिले. त्यानुसार, पुढील आदेश होईपर्यंत एका वैद्यकीय अधिकाऱ्याने शिव प्राथमिक आरोग्य केंद्रात तर दुसऱ्याने कोरेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात कामकाज पाहण्याचे निर्देश देण्यात आले. तसेच या आदेशाची तत्काळ अंमलबजावणी करून त्याचा अहवाल संबंधित कार्यालयाकडे सादर करण्याचे स्पष्ट आदेशही देण्यात आले आहेत.
मात्र, दिनांक २७ नोव्हेंबर २०२५ रोजी लेखी आदेश देऊनही संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्याने बदलीच्या ठिकाणी हजर न होता वरिष्ठांच्या आदेशालाच केराची टोपली दाखवल्याचे चित्र आहे. या प्रकारामुळे प्रशासनाच्या आदेशांचे पालन होणार की नाही, असा सवाल उपस्थित झाला असून, आता जिल्हा प्रशासन पुढील काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

