(मुंबई)
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) वस्तुनिष्ठ बहुपर्यायी परीक्षांच्या उत्तरपत्रिकांमध्ये महत्त्वाचे बदल जाहीर केले आहेत. आयोगाने याबाबत अधिकृत सूचना प्रसिद्ध केली असून हे नवे नियम १ मार्च २०२६ नंतर होणाऱ्या सर्व एमपीएससी परीक्षांपासून लागू होणार आहेत.
नव्या नियमांनुसार आता प्रत्येक प्रश्नासाठी चारऐवजी पाच पर्याय दिले जाणार आहेत. यामध्ये चार संभाव्य उत्तरे आणि एक अतिरिक्त पर्याय असणार आहे. उमेदवारांना पाचपैकी किमान एक पर्याय निवडणे बंधनकारक राहील. कोणताही पर्याय न निवडल्यास त्या प्रश्नासाठी २५ टक्के गुण वजा केले जाणार आहेत. त्यामुळे उत्तर माहीत नसले तरी पर्याय निवडणे आता अनिवार्य ठरणार आहे.
आयोगाच्या सूचनेनुसार उत्तरपत्रिका आता दोन भागांत विभागलेली असेल.
- भाग १ मध्ये फक्त प्रश्नांची उत्तरे नोंदवायची असतील.
- भाग २ मध्ये उमेदवाराचे नाव, बैठक क्रमांक, विषय संकेतांक, प्रश्नपत्रिका क्रमांक आणि उमेदवाराची स्वाक्षरी असणार आहे.
परीक्षा पूर्ण झाल्यानंतर पर्यवेक्षकांकडून हे दोन्ही भाग वेगळे केले जाणार आहेत. यामुळे उत्तरपत्रिकेच्या मूल्यमापन प्रक्रियेत गोपनीयता राखली जाईल, असे एमपीएससीने स्पष्ट केले आहे.
तसेच आयोगाने उत्तरपत्रिकेसंदर्भात काही कठोर नियम जाहीर केले आहेत. उत्तरपत्रिकेवर स्वाक्षरी न केल्यास, काळ्या बॉलपॉईंट पेनऐवजी अन्य पेन वापरल्यास किंवा उत्तरपत्रिकेवर अनावश्यक मजकूर, चिन्हे अथवा कोणतीही अतिरिक्त माहिती लिहिल्यास ती उत्तरपत्रिका थेट अवैध ठरवली जाणार आहे.
या बदलांमुळे उमेदवारांनी एमपीएससी परीक्षा देताना अधिक काळजीपूर्वक उत्तरपत्रिका भरणे आवश्यक ठरणार आहे. आयोगाने सर्व उमेदवारांना नव्या नियमांची माहिती नीट समजून घेण्याचे आवाहन केले आहे.

