(सांगली)
भारतीय महिला क्रिकेट संघाची उपकर्णधार आणि सांगलीची अभिमानास्पद कन्या स्मृती मंधाना हिचा विवाह सोहळा रविवारी सांगलीत पार पडणार होता. समडोळी रोडवरील मंधाना फार्म हाऊस येथे मोठ्या उत्साहात तयारी सुरू असताना अचानक घडलेल्या घटनेमुळे संपूर्ण वातावरणात खळबळ उडाली. लग्नस्थळीच स्मृतीचे वडील श्रीनिवास मंधाना यांना हृदयविकाराचा झटका आल्याने विवाह सोहळा पुढे ढकलावा लागला आहे. परिस्थितीची गंभीरता लक्षात घेऊन दोन्ही कुटुंबांनी एकमताने विवाह पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.
लग्नाची तयारी सुरू असतानाच धक्कादायक घटना
लग्नस्थळी सजावट आणि पाहुण्यांची आगमनाची लगबग चालू असतानाच श्रीनिवास मंधाना अचानक कोसळले. त्यानंतर त्यांना तातडीने सांगलीतील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. स्मृती मंधाना आणि कुटुंबीयही तिथे दाखल झाले असून त्यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. उपचार करणारे डॉ. नमन शहा म्हणाले, “सध्या रुग्णाची प्रकृती स्थिर आहे. ताण-तणावामुळे हा हृदयविकाराचा झटका आला असण्याची शक्यता आहे. पुढील दोन दिवस त्यांना देखरेखीखाली ठेवावे लागेल. तपासणीनंतर अँजिओग्राफीची गरज पडू शकते.”
या अचानक घडलेल्या प्रसंगामुळे विवाहस्थळी जमलेले पाहुणे परत पाठवण्यात आले. डेकोरेशन काढण्याचे कामही सुरू झाले.
स्मृती मंधानाचे मॅनेजर तोहिन मिश्रा यांनी सांगितले की, “आजचा लग्नसोहळा पुढे ढकलण्यात आला आहे. नवीन तारीख लवकरच निश्चित केली जाईल.”
स्मृती मंधाना आणि संगीत दिग्दर्शक पलाश मुच्छल यांचा विवाह रविवारी सायंकाळी साडेचार वाजता पार पडणार होता. क्रीडा आणि विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर या सोहळ्यास उपस्थित राहणार होते.
समडोळी रोडवरील मंधाना फार्म हाऊस येथे गेल्या दोन दिवसांपासून वेगवेगळे विधी पार पडत होते. २० नोव्हेंबरला पलाश मुच्छल सांगलीत दाखल झाला होता. हळद, संगीत आणि मेहंदी कार्यक्रमात भारतीय महिला क्रिकेट संघातील खेळाडू जेमीमा रॉड्रिग्ज, शेफाली वर्मा, रेणुका ठाकूर, यास्तिका भाटीया, स्नेह राणा, ऋचा घोष यांच्यासह इतर खेळाडू सहभागी झाले होते. पलाशची बहीण, सुप्रसिद्ध गीतकार फलक मुच्छल हीदेखील उपस्थित असून तिने हळद समारंभात संगीताच्या तालावर कार्यक्रमाचा आनंद लुटला.

