(रायगड)
खोपोली शहरात घडलेल्या सामाजिक आणि राजकीयदृष्ट्या अतिसंवेदनशील गुन्ह्याने संपूर्ण रायगड जिल्ह्यात खळबळ उडाली होती. घटनेनंतर आरोपी फरार झाल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत होता. “आरोपींना तात्काळ अटक करा” अशी मागणी नागरिक, कार्यकर्ते आणि नातेवाईकांकडून होत होती. परिस्थिती तणावपूर्ण बनली असताना कायदा व सुव्यवस्था राखणे हे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते.
या पार्श्वभूमीवर रायगड-अलिबागचे पोलीस अधीक्षक आँचल दलाल, अपर पोलीस अधीक्षक अभिजीत शिवथरे आणि खालापूर उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. विशाल नेहूल यांनी थेट जनतेशी संवाद साधला. फरार आरोपींचा शोध घेऊन त्यांना लवकरात लवकर अटक करण्यात येईल, असे ठाम आश्वासन पोलिस प्रशासनाकडून देण्यात आले. या भूमिकेमुळे संतप्त जनतेला काहीसा दिलासा मिळाला होता.
दरम्यान, गुन्ह्यातील फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी तात्काळ पाच विशेष पोलीस पथके स्थापन करण्यात आली. या पथकांमध्ये अनुभवी अधिकारी आणि अंमलदारांचा समावेश होता. तांत्रिक तपासात आरोपींनी मोबाईल फोन बंद करून मुंबई तसेच इतर ठिकाणी पळ काढल्याचे निष्पन्न झाले. तसेच आरोपींना मदत करणारे काही सहआरोपी असल्याची माहितीही पोलिसांना मिळाली.
ठोस माहिती नसतानाही पोलिसांनी आधुनिक तंत्रज्ञान, गोपनीय माहिती, हालचालींचे विश्लेषण आणि तपास कौशल्याचा प्रभावी वापर केला. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली रात्रंदिवस शोधमोहीम राबवत अखेर केवळ २४ तासांत फरार आरोपींना अटक करण्यात यश आले.
अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये
१) रविंद्र परशुराम देवकर, २) दर्शन रविंद्र देवकर, ३) धनेश रविंद्र देवकर, ४) उर्मीला रविंद्र देवकर, ५) विशाल सुभाष देशमुख
६) महेश शिवाजी धायतडक, ७) सागर राजु मोरे, ८) सचिन दयानंद खराडे, ९) दिलीप हरिभाऊ पवार यांचा समावेश आहे.
या कारवाईनंतर खोपोली शहरातील तणाव काहीसा निवळला आहे. संवेदनशील परिस्थितीत रायगड पोलिसांनी दाखवलेली तत्परता, नियोजनबद्ध तपास आणि कार्यक्षमता याचे सर्वत्र कौतुक होत आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास सुरू असून, मदत करणारे आरोपी, इतर दुवे आणि गुन्ह्यामागील नेमका कट उघड करण्यासाठी सखोल चौकशी केली जात आहे.

