(मुंबई)
गोरेगावमधील आरे पोलिस ठाण्याच्या हद्दीत धक्कादायक घटना समोर आली आहे. पत्नीचे कथित प्रेमसंबंध असल्याच्या संशयातून संतप्त झालेल्या पतीने पत्नीसमोरच तिच्या कथित प्रियकराची चाकूने गळा चिरून निर्घृण हत्या केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरात भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. भीमराज ओमप्रकाश शर्मा असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून तो 48 वर्षांचा आहे. तर मृत व्यक्तीचे नाव विकास अशोक भुसारे असे आहे. दोघेही गोरेगावमधील आर कॉलनी परिसरातील युनिट क्रमांक 5 येथे राहत होते.
पत्नीच्या कथित संबंधांवरून सतत वाद
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी भीमराज शर्मा याला आपल्या पत्नीचे आणि विकास भुसारे यांचे कथित प्रेमसंबंध असल्याचा बराच काळ संशय होता. याच कारणावरून तो पत्नीशी वारंवार वाद घालत होता. तसेच, या घटनेच्या काही काळापूर्वी विकासने आरोपीच्या पत्नीची छेड काढल्याची तक्रारही करण्यात आली होती. मात्र त्यानंतरही विकास पत्नीच्या संपर्कात असल्याचा संशय आरोपीच्या मनात कायम होता. यामुळे आरोपी संतप्त अवस्थेत राहत असल्याची माहिती पोलिस तपासात समोर आली आहे.
तिघांनी एकत्र बसून केली दारू पार्टी
घटनेच्या दिवशी आरोपीने विकासला आपल्या घरी बोलावले होते. रात्री उशिरापर्यंत आरोपी, त्याची पत्नी आणि विकास यांनी एकत्र बसून मद्यपान केले. सुरुवातीला वातावरण सामान्य असल्याचे दिसत होते. मात्र काही वेळानंतर आरोपीचा जुना राग काढण्यास सुरुवात केली, यावेळी बाचाबाचीतून दोघांचा संताप अनावर झाला. “माझ्या घरी वारंवार का येतोस? पुन्हा इथे येऊ नकोस,चालता हो” असे म्हणत आरोपीने विकाससोबत जोरदार वाद घातला. वाद विकोपाला गेल्यानंतर आरोपीने घरातील धारदार चाकू उचलून विकासवर हल्ला चढवला.
पत्नीसमोरच गळा चिरून हत्या
संतापलेल्या आरोपीने विकासच्या गळ्यावर वार करत त्याचा गळा चिरल्याची माहिती पोलिसांनी दिली. गंभीर जखमी झालेला विकास घरातच रक्ताच्या थारोळ्यात कोसळला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. ही संपूर्ण घटना आरोपीच्या पत्नीसमोर घडली. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे ती काही काळ पूर्णपणे घाबरून गेली. नेमकं काय करावं आणि कोणाला मदतीला बोलवावं हे तिला समजत नव्हतं, अशी माहिती तपासातून समोर आली आहे.
हत्या करून जंगलात पळाला आरोपी
हत्या केल्यानंतर आरोपी भीमराज शर्मा हा आरे जंगल परिसरात पळून गेला. घटनेची माहिती मिळताच आरे पोलीस ठाणे येथील पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पंचनामा केला आणि तपासाला सुरुवात केली. आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांनी तीन स्वतंत्र पथके तयार केली. तांत्रिक तपास आणि स्थानिक माहितीच्या आधारे पोलिसांनी अवघ्या तीन तासांत आरोपीचा शोध घेत त्याला जंगल परिसरातून अटक केली.
आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली
पोलिस चौकशीत आरोपीने हत्या केल्याची कबुली दिली आहे. त्याच्याविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून न्यायालयात हजर केल्यानंतर त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या खळबळजनक घटनेमुळे गोरेगाव आणि आरे परिसरात मोठी चर्चा सुरू झाली असून, वैवाहिक संशयातून घडलेल्या या हत्येने परिसर हादरला आहे.

