(राजापूर)
तालुक्यातील भालावली गावात जानेवारी २०२३ मध्ये घडलेल्या खळबळजनक खून प्रकरणात जिल्हा न्यायालयाने आरोपी विनायक शंकर गुरव याला जन्मठेपेची कठोर शिक्षा सुनावली आहे. दोन महाविद्यालयीन तरुणींवर लाकडी दांड्याने प्राणघातक हल्ला करून एका तरुणीचा निर्घृण खून केल्याप्रकरणी हा निकाल देण्यात आला. ही घटना १८ जानेवारी २०२३ रोजी सकाळी सुमारे १०.४५ वाजता भालावली वरी गुरववाडी परिसरात घडली होती. गावातील सुतक-सुवेर पाळणे आणि नवदुर्गा मंदिराच्या देव दास्तानावरून दोन गटांमध्ये दीर्घकाळ वाद सुरू होता. मयूर मुकुंद गुरव (वय २४, रा. वरी गुरववाडी) यांच्या कुटुंबाकडे देव दास्तान असल्याने दुसऱ्या गटात असंतोष होता. या वादातूनच मयूर यांच्या कुटुंबाला सातत्याने धमक्या व त्रास दिला जात होता.
या पार्श्वभूमीवर आरोपी विनायक गुरव याचे घरकुल मयूर गुरव यांच्या गटातील जागेत मंजूर झाले होते. त्या बांधकामाला न्यायालयीन स्थगिती मिळाल्याने आरोपीच्या मनात तीव्र राग आणि सूडभावना निर्माण झाली होती, असे तपासात समोर आले.
घटनेच्या दिवशी मयूर गुरव यांची बहीण साक्षी आणि तिची मैत्रीण सिध्दी संजय गुरव या दोघी महाविद्यालयातून घरी पायी परतत असताना आरोपीने संतोष गुरव यांच्या आंबा बागेजवळ त्यांना अडवले. “देवाचे दास्तान देत नाही आणि सुवेर-सुतक पाळत नाही” असे म्हणत आरोपीने लाकडी दांड्याने त्यांच्या डोके व मानेवर जोरदार हल्ला केला. या हल्ल्यात साक्षी जागीच गंभीर जखमी होऊन बेशुद्ध पडली, तर सिध्दी गंभीर जखमी झालेली असूनही पळून जाण्यात यशस्वी झाली.
दोघींनाही तातडीने धारतळे प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी साक्षीला मृत घोषित केले. याप्रकरणी मयूर गुरव यांनी राजापूर नाटे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी भा.दं.वि. कलम ३०२, ३२६, ५०६ आणि २०१ अन्वये गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली.
जिल्हा न्यायालयात चाललेल्या खटल्यात सरकारी पक्षातर्फे जिल्हा सरकारी अभियोक्ता ॲड. अनाध्द फणसेकर यांनी काम पाहिले. एकूण १४ साक्षीदारांच्या साक्षी ग्राह्य धरत न्यायालयाने आरोपी विनायक शंकर गुरव याला सर्व आरोपांत दोषी ठरवले आणि जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
या निकालामुळे भालावली परिसरात न्याय मिळाल्याची भावना व्यक्त होत आहे.

