(राजापूर / तुषार पाचलकर)
कोकण दौऱ्यावर सादर होत असलेला ‘लागली पैज’ हा नाट्यप्रयोग दमदार अभिनय, भावनिक आशय आणि वेगळ्या मांडणीमुळे रसिकांच्या मनाला भिडताना दिसत आहे. टाळ्यांचा कडकडाट आणि अंतर्मुख शांततेचे क्षण अशा दोन्ही टोकांचा अनुभव देणारा हा प्रयोग प्रत्येक सादरीकरणात अधिकच रंगतदार ठरत आहे.
कोकण दौऱ्यातील दोन दिवसांच्या कार्यक्रमांतर्गत रत्नागिरी जिल्ह्यातील पहिला प्रयोग लांजा येथे सादर करण्यात आला. या प्रयोगाला नाट्यरसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. त्यानंतर रविवारी, १८ जानेवारी रोजी मल्हार प्रकाशित प्रभात थिएटर्स निर्मित ‘लागली पैज’ या नाटकाचा दुसरा प्रयोग चिपळूण येथील इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रात रात्री ८.३० वाजता पार पडला.
हर्षद प्रमोद कठापुरकर यांच्या लेखणीतून साकार झालेले हे नाटक अंकुर अरुण काकतकर यांच्या दिग्दर्शनाखाली रंगमंचावर आले आहे. नाटकाची निर्मिती निखिल एकनाथ करंडे (धामणी) आणि ज्योती प्रमोद कठापुरकर यांनी केली आहे.
यशोमान आपटे, रुमाणी खरे, शंतनु अंबाडेकर आणि सुप्रिया विनोद यांनी आपल्या प्रभावी अभिनयातून भूमिका सशक्तपणे साकारल्या.
पत्रांच्या माध्यमातून उलगडणारे जीवन, नातेसंबंधांतील भावनांची सूक्ष्म मांडणी आणि शब्दांच्या ताकदीवर उभा राहिलेला हा नाट्यप्रयोग प्रेक्षकांना वेगळाच अनुभव देतो. पारंपरिक रंगमंचीय चौकटींपेक्षा वेगळ्या संकल्पनेत सादर झालेल्या या नाटकाने रसिकांना भावनांचा अविस्मरणीय प्रवास घडवला आहे. प्रत्येक प्रसंगानंतर टाळ्यांचा गजर, कलाकारांना मिळणारी उत्स्फूर्त दाद आणि भरलेले प्रेक्षागृह यामुळे दोन्ही प्रयोगांच्या वेळी वातावरण भारावून गेले होते.
नाटकाला मिळणाऱ्या प्रतिसादाबद्दल रसिक प्रेक्षक राकेश लाड म्हणाले, ‘लागली पैज’ नाटक रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे, हे पाहून समाधान वाटते. गुलाबी थंडीतही कोकणातील नाट्यप्रेमींनी नाटकाला भरभरून प्रतिसाद दिला आहे. लांजाच्या प्रयोगानंतर चिपळूणमधील प्रयोगालाही तितकाच उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
कोकणातील नाट्यरसिकांसाठी ‘लागली पैज’ हा नाट्यप्रयोग निश्चितच एक संस्मरणीय अनुभव ठरत आहे.

