(राजापूर / तुषार पाचलकर)
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत शिवसेनेने एकदिलाने, संघटितपणे आणि महायुतीच्या बळावर लढा देऊन सर्वत्र भगवा झेंडा फडकवायचा आहे, असे आवाहन आमदार किरण सामंत यांनी शिवसेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना केले. “आपल्याला विकासाचे राजकारण करायचे आहे आणि त्यासाठी पक्षसंघटन अधिक बळकट करायचे आहे,” असे ते म्हणाले.
राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) चे माजी तालुका अध्यक्ष व माजी जिल्हा परिषद सदस्य गोपाळ उर्फ आबा आडिवरेकर यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसह शिवसेनेत प्रवेश केल्याने हा कार्यक्रम विशेष ठरला. त्यांच्या प्रवेशाने संघटनेला मोठी बळकटी मिळेल, असा विश्वास आमदार सामंत यांनी यावेळी व्यक्त केला.
कृषी आणि पर्यटनातून तालुक्याचा विकास साधू
राजापूर तालुक्याच्या पूर्व विभागात कृषी क्षेत्राच्या माध्यमातून आणि पश्चिम विभागात पर्यटनाच्या माध्यमातून विकास साधण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे आमदार सामंत यांनी सांगितले.
या कार्यक्रमात हरळ गावच्या सरपंच माधवी पांचाळ यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य आणि उ.बा.ठा. पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनीही शिवसेनेत प्रवेश केला. आमदार किरण सामंत यांनी सर्व नवागत कार्यकर्त्यांचे पक्षात स्वागत केले.
जल्लोषमय प्रवेश सोहळा
हा पक्षप्रवेश सोहळा तळवडे येथील प्रभावती सभागृहात पार पडला. या वेळी जिल्हा संघटक प्रकाश कुवळेकर, महिला आघाडी जिल्हा उपाध्यक्षा दुर्वा तावडे, तालुकाप्रमुख दीपक नागले, तसेच अविनाश पराडकर, दीपक बेंद्रे, आत्माराम सुतार, बाबालाल फरार (सरपंच, पाचल), सुरेश ऐनाकर, बाबू वेरवडे, प्रतिक मटकर, शैलेश साळवी, सुनिल गुरव, अमर जाधव, रवींद्र सावंत, संतोष सावंत, विकास रेघे, मंदार सप्रे, गणेश तावडे, श्वेता पवार, विधी पांचाळ, बाळा चव्हाण, बाबा सावंत, जगदीश उर्फ सोनू पाथरे, तुषार पांचाळ, महादेव गुरव, संदीप बारस्कर यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
पद हे ओळख नसून निष्ठा हेच आपले मोठे पद
कार्यक्रमात बोलताना आमदार सामंत म्हणाले, “शिवसेना ही जनतेच्या प्रश्नांसाठी लढणारी पक्षसंघटना आहे. आपण विकासाचे राजकारण करतो. आबा आडिवरेकर यांचा प्रवेश हा पक्षसंघटनेला नवी ऊर्जा देणारा क्षण आहे. पक्षात आलेल्या प्रत्येकाचा योग्य सन्मान केला जाईल. जिल्हाध्यक्ष राहुल पंडीत लवकरच जिल्हा कार्यकारिणी जाहीर करतील आणि सर्वांना संधी दिली जाईल. मात्र पद मिळो वा न मिळो, आपण सर्वजण निष्ठावान शिवसैनिक आहोत, हेच आपले सर्वात मोठे पद आहे.”
ते पुढे म्हणाले, “आपल्याला महायुतीच्या बळावर ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगर परिषद आणि नगरपालिका निवडणुका जिंकायच्या आहेत. प्रत्येक ठिकाणी महायुतीचा भगवा झेंडा फडकवायचा आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार यांचे स्वप्न आपण एकत्रितपणे साकार करायचे आहे.”
शिवसेनेच्या नेतृत्वावर माझा पूर्ण विश्वास — आबा आडिवरेकर
या प्रसंगी बोलताना आबा आडिवरेकर म्हणाले, “शिवसेना ही जनतेच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरून लढणारी संघटना आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री उदय सामंत आणि आमदार किरण सामंत यांच्या नेतृत्वावर माझा पूर्ण विश्वास आहे. त्यांच्या विकासाच्या धोरणात सहभागी होण्यासाठी मी शिवसेनेत प्रवेश केला आहे. पूर्वी कै. भाईसाहेब हातणकर यांच्यासोबत काँग्रेसमध्ये निष्ठेने काम केले, तसेच आता शिवसेनेतही शेवटच्या श्वासापर्यंत निष्ठेने काम करणार आहे.”
त्यांच्यासोबत खूशीराम मोरे, विनोद पवार, अमित चिले, संजय गुरव, जगदीश गुरव, सखाराम म्हाडये, संजीव मोरे, जगन्नाथ घडशी, आत्माराम नारकर, नितिन शिंदे, विजय पावसकर, रमजान बलबले यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.
ज्येष्ठ नेत्यांचे उपस्थिती व शुभेच्छा
कार्यक्रमास शिवसेनेचे ज्येष्ठ नेते चंदूभाई देशपांडे उपस्थित होते. त्यांनी आबा आडिवरेकर यांच्या प्रवेशाचे स्वागत करत आमदार किरण सामंत यांच्या कार्यपद्धतीचे कौतुक केले.
यावेळी दीपक नागले, दुर्वा तावडे, दीपक बेंद्रे, मंगेश पांचाळ यांनीही मनोगत व्यक्त केले. तसेच आप्पा साळवी, सुरेश ऐरणारकर, संदीप बारस्कर, गायत्री साळवी, विहंग खानविलकर, अमित साळवी, मनोज आडवीलकर (नाटे विभाग प्रमुख), अरविंद लांजेकर यांसह शिवसेनेचे सर्व तालुका पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

