(राजापूर / तुषार पाचलकर)
राजापूर प्रांत कार्यालयासमोरील पुलावर काल सायंकाळी झालेल्या अपघातात वाहनाच्या धडकेत एका बैलाचा मृत्यू झाला. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत असून, मोकाट जनावरांच्या समस्येकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
उपविभागीय अधिकारी, तहसीलदार आणि गटविकास अधिकारी यांनी या संदर्भात वारंवार आदेश दिलेले असतानाही ते सरपंच, ग्रामसेवक आणि संबंधित ग्रामपंचायतींकडून कार्यान्वित केले जात नसल्याचे स्पष्ट होत आहे. गटविकास अधिकाऱ्यांच्या पत्रव्यवहाराला स्थानिक पातळीवर गांभीर्याने न घेतल्याने हे आदेश शेतकऱ्यांपर्यंत किंवा मोकाट गुरांच्या मालकांपर्यंत पोहोचत नाहीत. परिणामी रस्त्यावर भटकणाऱ्या जनावरांमुळे अपघाताचे प्रमाण वाढत असून निष्पाप जनावरांचा बळी जात आहे.
स्थानिक नागरिकांनी याबाबत सवाल उपस्थित केला आहे की, ग्रामपंचायतींचे निवडून आलेले सदस्य, सरपंच आणि ग्रामसेवक प्रशासनाच्या आदेशांवर कार्यवाही करत नसतील, तर त्यांना जाब कोण विचारणार? अशा कर्मचाऱ्यांवर कारवाईच झाली पाहिजे. पंचायत समितीच्या स्तरावरही याकडे दुर्लक्ष होत असल्याची टीका जनतेतून होत आहे.
काल झालेल्या अपघातानंतर मृत बैलाची विल्हेवाट पोलीस प्रशासन व बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी रात्री उशिरा केली. ही घटना टाळण्यासाठी स्थानिक प्रशासनाने संगोपन, ताबा व जनजागृतीसाठी तातडीने उपाययोजना राबवण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

