(मुंबई)
रेबीज हा आजार वैद्यकीयदृष्ट्या शंभर टक्के टाळता येण्याजोगा असला, तरी भारतात तो आजही हजारो लोकांचा जीव घेत आहे. अपुरी आरोग्यसेवा, माहितीचा अभाव आणि महागडे उपचार यामुळे रेबीज देशातील एक गंभीर सार्वजनिक आरोग्य समस्या बनली आहे. विशेषतः गरीब, ग्रामीण भागातील तसेच शहरी झोपडपट्टीत राहणाऱ्या नागरिकांना या आजाराचा सर्वाधिक फटका बसत आहे.
जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार दरवर्षी जगभरात सुमारे ५९ हजार लोकांचा मृत्यू रेबीजमुळे होतो. यापैकी सुमारे ३६ टक्के मृत्यू भारतात होतात. म्हणजेच दरवर्षी देशात अंदाजे हजार पर्यंत नागरिक रेबीजमुळे दगावतात. चिंताजनक बाब म्हणजे या मृत्यूंमध्ये गरीब आणि दुर्लक्षित समुदायांचा मोठा वाटा आहे.
रेबीजचा प्रसार प्रामुख्याने कुत्र्यांच्या चाव्यांमुळे होतो. जागतिक आरोग्य संघटनेनुसार भारतातील ९९ टक्के रेबीज प्रकरणे ही कुत्र्यांच्या चाव्यांमुळे होतात. देशात दरवर्षी कोट्यवधी लोकांना कुत्रे चावतात. केंद्र सरकारच्या आकडेवारीनुसार २०२४ मध्ये देशात ३७ लाखांहून अधिक कुत्रा चावण्याच्या घटना नोंदवण्यात आल्या आहेत. म्हणजेच दररोज सरासरी १० हजारांपेक्षा जास्त लोक कुत्र्यांच्या चाव्यांना बळी पडत आहेत. यामध्ये लहान मुलांचे प्रमाण लक्षणीय आहे.
विविध अभ्यासानुसार रेबीजमुळे होणाऱ्या मृत्यूंपैकी ३० ते ६० टक्के मृत्यू हे १५ वर्षांखालील मुलांचे आहेत. अनेक वेळा मुलांना झालेली कुत्र्याची चाव्याची जखम गांभीर्याने घेतली जात नाही किंवा वेळेत उपचार मिळत नाहीत. याचे परिणाम अनेकदा प्राणघातक ठरतात. सकाळी शाळेत जाणारी मुले, दुधवाले तसेच रात्री उशिरा कामावरून परतणारा गोरगरीब कष्टकरी वर्ग आज भटक्या कुत्र्यांच्या टोळ्यांमुळे भीतीच्या वातावरणात वावरताना दिसत आहे.
रेबीज हा आजार केवळ जीवघेणा नाही, तर आर्थिकदृष्ट्याही अत्यंत महागडा आहे. कुत्र्याने चावल्यानंतर तातडीने रेबीज प्रतिबंधक लसींचा संपूर्ण कोर्स घेणे अत्यावश्यक असते. गंभीर चाव्यांमध्ये रेबीज इम्युनोग्लोब्युलिन देणे गरजेचे असते. मात्र अनेक सरकारी आरोग्य केंद्रांमध्ये या लसी आणि आवश्यक औषधे नियमितपणे उपलब्ध नसतात. त्यामुळे गरीब रुग्णांना खासगी रुग्णालयांचा आधार घ्यावा लागतो. एका रुग्णाच्या उपचारांवर हजारो ते दहा-पंधरा हजार रुपयांपर्यंत खर्च येतो. गरीब कुटुंबांसाठी हा खर्च मोठे ओझे ठरतो आणि अनेक वेळा उपचार अर्धवट सोडले जातात. हाच निष्काळजीपणा पुढे रेबीज मृत्यूचे कारण बनतो.
भारतामध्ये भटक्या कुत्र्यांची वाढती संख्या ही रेबीज नियंत्रणातील मोठी अडचण ठरत आहे. शहरी आणि ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर मोकाट कुत्रे आढळतात. नसबंदी आणि लसीकरण कार्यक्रम अपुरे ठरत असल्याने कुत्र्यांची संख्या नियंत्रणात येत नाही. याचा थेट परिणाम मानवी रेबीज प्रकरणांवर होत आहे.
केंद्र सरकारकडून नॅशनल रेबीज कंट्रोल प्रोग्राम अंतर्गत कुत्र्यांचे लसीकरण, नसबंदी आणि जनजागृती मोहिमा राबवण्यात येत आहेत. काही शहरांमध्ये या उपाययोजनांचे सकारात्मक परिणाम दिसून आले असले, तरी देशपातळीवर त्यांची प्रभावी अंमलबजावणी अद्याप अपुरी आहे.
रेबीज हा आजार आता केवळ वैद्यकीय प्रश्न न राहता सामाजिक आणि आर्थिक समस्या बनला आहे. माहितीचा अभाव, वेळेवर उपचार न मिळणे आणि महागडे उपचार यामुळे हा आजार गरीबांसाठी अधिक घातक ठरत आहे. रेबीज पूर्णपणे टाळता येऊ शकतो, मात्र त्यासाठी प्रभावी धोरण, मजबूत सार्वजनिक आरोग्य व्यवस्था आणि व्यापक जनजागृतीची नितांत गरज आहे. अन्यथा दरवर्षी हजारो निष्पाप जीव या टाळता येणाऱ्या आजारामुळे जाण्याचा धोका आरोग्य क्षेत्रातील जाणकार व्यक्ती देतात.
डॉक्टरांच्या माहितीप्रमाणे, रेबीजचा संसर्ग झाल्यानंतर एका आठवड्यापासून ते एक वर्षात लक्षणं दिसू लागतात. पण, सामान्यत: आजाराची लक्षणं 2-3 महिन्यातही दिसून येतात. याबाबतची लक्षणे पुढील प्रमाणे आहेत
- ताप आणि अंगदुखी होणं
- व्हायरस सेंट्रल नर्व्हस सिस्टिममध्ये (चेतासंस्थेत) शिरल्यानंतर मेंदू आणि मणक्यात सूज येणं
- फ्युरिअस रेबीजमध्ये रुग्णाचं वागणं बदलतं. रुग्ण हायपर होतो किंवा त्यांना पाण्याची भीती वाटू लागते
- हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने मृत्यू होणं
- पॅरेलॅटीक रेबीजमध्ये स्नायू हळूहळू कमकूवत होतात. रुग्ण कोमात जातो आणि त्यानंतर मृत्यू होतो
यावर तात्काळ उपचार केले नाहीत तर 100 टक्के प्रकरणांमध्ये रुग्णाचा जीव जातो. रेबीज व्हायरस प्राण्यांच्या लाळेतून माणसाच्या शरीरात प्रवेश करतो. त्यामुळे प्राणी चावल्यानंतर जखमेची जागा स्वच्छ करणं सर्वांत महत्त्वाचं आहे. प्राण्याच्या चावल्यानंतर जखमेवर योग्य उपचार अत्यंत महत्त्वाचे आहेत. त्यामुळे संसर्ग शरीरातील इतर भागात पसरण्यावर नियंत्रण मिळवता येतं. ज्यामुळे पुढील गुंतागुंत कमी होते.
नॅशनल सेंटर फॉर डिसीज कंट्रोलने (NCDC) प्राणी चावल्यामुळे झालेली जखम कशी स्वच्छ करावी यासाठी मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत
- प्राणी चावल्यामुळे जखम झालेल्या जागेवरची लाळ लवकरात लवकर स्वच्छ करावी.
- पाणी आणि साबणाने जखमेचा भाग 15 मिनिटं स्वच्छ धूवावा.
- जखम धुवून झाल्यानंतर त्यावर अॅन्टिसेप्टिक लावावं.
- साबण किंवा व्हायरसविरोधी पदार्थ (अल्कोहोल, प्रोव्हिडोन आयोडिन) उपलब्ध नसेल तर जखम पाण्याने धूवावी.
- जखमेत संसर्ग होऊ नये यासाठी टीटॅनसचं इंजेक्शन घ्यावं.
- कुत्रा चावलेल्या रुग्णाला मानसिक आधार द्यावा.
- तात्काळ डॉक्टर किंवा रुग्णालयात जाऊन वैद्यकीय मदत घ्यावी.

