(देवळे / प्रकाश चाळके)
रत्नागिरी जिल्ह्यातील आंबा पिकावरील फुलकीड (Thrips) नियंत्रण, मोहोर संरक्षण आणि इतर कीड-रोग व्यवस्थापनासाठी कृषी विभाग आणि डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ सरसावले आहे. दोन्ही विभागांच्या संयुक्त विद्यमाने आंबा उत्पादकांसाठी विशेष वेबिनार मालिकेचे आयोजन करण्यात आले आहे.
आता दर महिन्याच्या दुसऱ्या व चौथ्या बुधवारी सायंकाळी ६:०० वाजता जिल्ह्यातील शेतकऱ्यांना थेट शास्त्रज्ञांकडून तांत्रिक मार्गदर्शन मिळणार आहे. बदलत्या हवामानामुळे आंबा पिकावर होणारे परिणाम आणि त्यावरील उपाययोजनांची माहिती जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
वेबिनारची प्रमुख वैशिष्ट्ये व लाभ:
तज्ज्ञांचे थेट मार्गदर्शन: कोकण कृषी विद्यापीठाचे शास्त्रज्ञ बागायतदारांशी थेट संवाद साधून तांत्रिक माहिती देतील.
कीड व रोग नियंत्रण : प्रामुख्याने फुलकीड (Thrips) आणि इतर रोगांवर प्रभावी व वेळेत करावयाच्या उपाययोजनांची माहिती.
मोहोर संरक्षण: बदलत्या वातावरणात आंबा मोहोर टिकवून धरण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर.
शंका निरसन: शेतकऱ्यांना आपल्या बागेतील समस्यांबाबत शास्त्रज्ञांना थेट प्रश्न विचारून उत्तरे मिळवता येतील.
पहिल्या सत्राचे नियोजन:
या मार्गदर्शक मालिकेचे पहिले ऑनलाईन सत्र बुधवार, दिनांक ३१ डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळी ६:०० वाजता.होणार आहे. या वेबिनारची लिंक कृषी विभागाच्या क्षेत्रीय अधिकाऱ्यांमार्फत व्हॉट्सॲप व इतर समाजमाध्यमांतून शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवली जाईल.
कृषी विभागाचे आवाहन:
रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व आंबा उत्पादक शेतकऱ्यांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा. आपल्या बागेचे रक्षण आणि दर्जेदार उत्पादनासाठी या वेबिनारमध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात येत आहे. अधिक माहितीसाठी आपल्या भागातील कृषी सहाय्यक, मंडळ कृषी अधिकारी किंवा तालुका कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा.
असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, रत्नागिरी यांनी केले आहे.

