(मुंबई)
मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे, या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी मुंबईत तब्बल पाच दिवस उपोषण केले. या उपोषणाला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. हजारो मराठा बांधव थेट मुंबईत धडकले होते, त्यामुळे दक्षिण मुंबई ठप्प झाली होती. सर्व मुख रस्त्यांवर मराठा मोर्चेकरी दिसत होते. या दबावामुळे सरकारला अखेर नमते घ्यावे लागले आणि हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा शासन निर्णय जाहीर करण्यात आला. हा मराठा समाजाचा मोठा विजय असल्याचा दावा मनोज जरांगे यांनी केला आहे.
उपोषण यशस्वी झाल्यानंतर जरांगे यांनी आता मराठा बांधवांना एक महत्त्वाचा आदेश दिला आहे. त्यांनी सर्व समाजबांधवांना आगामी दसरा मेळाव्यासाठी जोमाने तयारीला लागा असे आवाहन केले.
नारायणगडावर दर्शनासाठी गेलेल्या जरांगे यांचे गुलाल उधळून स्वागत करण्यात आले. यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितले, “सरकारच्या या निर्णयामुळे मराठा समाजातील लेकरांचे कल्याण होणार आहे. यंदाचा दसरा मेळावा भव्यदिव्य होणार असून सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे,” असे त्यांनी स्पष्ट केले.
जरांगे पुढे म्हणाले, “या वर्षी तयारीसाठी वेळ कमी आहे, तरी जो छोटा-मोठा मेळावा होईल त्याची नीट तयारी केली जाईल. परंपरेनुसार आपल्याला दसरा मेळावा 100 टक्के करायचा आहे. याच मेळाव्यातून आपण सरकारला दाखवू की आम्ही आमचे हक्क कसे मिळवतो,” असा इशारा त्यांनी दिला.
सरकारने जाहीर केलेल्या शासन निर्णयामुळे संपूर्ण मराठवाड्यातील मराठा समाज आरक्षणाच्या कक्षेत येणार असल्याचे त्यांनी नमूद केले. “हा निर्णय समाजाच्या फायद्याचा आहे. काही त्रुटी राहिल्या तर सुधारित जीआर काढावा लागेल. गरज पडली तर आणखी लढा देण्यासाठी मी सदैव तयार आहे,” असेही त्यांनी ठामपणे सांगितले.
आरक्षणाबद्दल मराठा समाजामध्ये संभ्रम असल्याचे दिसत आहे. यावर जरांगे यांनी जर आम्हाला आरक्षण दिले नाही किंवा पुन्हा धोका झाला तर आम्ही मुंबईकरांचा भाजीपाला, दूध बंद करू अशी धमकी दिली आहे. तसेच हे बंद झाले की मुंबईकर काय वाळू खाणार का, असाही सवाल विचारला आहे. आता उपोषण करणार नाही, रस्त्यावर उतरणार असल्याचाही इशारा जरांगे यांनी दिला आहे.

