(संगमेश्वर / एजाज पटेल)
कोल्हापूरहून कोकणात आलेल्या पर्यटकांच्या आनंदावर विरजण पडले आहे. संगमेश्वर तालुक्यातील सोनवी नदी पात्रात पोहण्यासाठी उतरलेल्या ३७ वर्षीय तरुणाचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. अजित शंकर बोरगे (रा. राजारामपुरी, शाहूनगर, १३ वी गल्ली, कोल्हापूर) असे मृत तरुणाचे नाव असून, या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
संगमेश्वर पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, अजित बोरगे हा त्याचा मावस भाऊ विनोद मोहन कलकुटकी (वय ४४) आणि इतर मित्रांसह टाटा सुमो ग्रँड (क्र. MH-10 AM-2270) गाडीने संगमेश्वर येथील मित्र सागर याच्या आजोळी फिरण्यासाठी आले होते. कडक उन्हाळा असल्याने दुपारच्या वेळी थंडावा मिळवण्यासाठी सर्व मित्र लोवले येथील सोनवी नदीच्या पात्रात पोहण्यासाठी गेले.
सुखद सहलीचा शेवट शोकांतिकेत
नदीकिनारी आल्यानंतर मित्रांनी जेवणाची जय्यत तयारी केली होती. सोबत आणलेले चिकन आणि भात नदीपात्राशेजारीच चुलीवर शिजत ठेवले होते. जेवण तयार होईपर्यंत एक फेरफटका मारून पोहण्याचा आनंद घेऊ, या विचाराने सर्वजण पाण्यात उतरले. मात्र, आपण केलेले जेवण अर्धेच राहणार आहे, याची कोणालाही कल्पना नव्हती. पाण्याचा अंदाज न आल्याने अजित बोरगे नदीच्या पात्रात खोलवर बुडू लागला.
त्यांला वाचवण्यासाठी मित्रांनी शर्थीचे प्रयत्न केले. अथक प्रयत्नांनंतर त्यांना पाण्याबाहेर काढून तातडीने टाटा सुमो गाडीतून संगमेश्वर येथील धन्वंतरी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. तेथील डॉ. मुळ्ये यांनी त्याची प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय संगमेश्वर येथे नेण्याचा सल्ला दिला. मात्र, ग्रामीण रुग्णालयात पोहोचताच डॉक्टरांनी तपासणी करून अजित यांना मृत घोषित केले.
या घटनेची माहिती मिळताच संगमेश्वर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. विनोद मोहन कलकुटकी यांनी दिलेल्या खबरीवरून संगमेश्वर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची (आमृ रजि. नं १४/२०२६) नोंद करण्यात आली आहे. घटनेचा जाहीर रिपोर्ट देवरूख येथील कार्यकारी दंडाधिकारी यांच्याकडे पाठवण्यात आला आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक आर. एस. गावीत या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
एकीकडे कोकणच्या निसर्गाचा आनंद घेण्याचे स्वप्न आणि दुसरीकडे शिजत असलेले जेवण मागे सोडून अजित यांनी जगाचा निरोप घेतल्याने त्यांच्या कुटुंबावर आणि मित्र परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

