(सोलापूर)
प्रेमविवाह, नव्या संसाराची स्वप्नं आणि घरी आलेल्या चिमुकल्या पावलांचा आनंद साजरा करण्याचं वय असतानाच उत्तर सोलापूर तालुक्यातील तळे हिप्परगा येथे हृदयद्रावक घटना घडली आहे. येथील 22 वर्षीय प्रेम अंकुश जाधव या तरुणाने पत्नी आणि अवघ्या दोन महिन्यांच्या मुलीपासून दूर राहू न शकल्याने टोकाचं पाऊल उचलत रविवारी मध्यरात्री गळफास घेऊन आत्महत्या केली. पत्नी सासरी न आल्याने त्रस्त झालेल्या प्रेमने घराच्या पडवीत साडीने गळफास घेतला. मृत्यूपूर्वी पत्नीला पाठवलेली त्याची ऑडिओ क्लिप सध्या समोर आली असून, ती ऐकून अनेकांचे डोळे पाणावले आहेत.
नेमकं काय घडलं?
प्रेम जाधवने सुमारे वर्षभरापूर्वी प्रेमविवाह केला होता. संसार सुरू असतानाच दोन महिन्यांपूर्वी पत्नी प्रसूतीसाठी माहेरी गेली. प्रसूतीनंतर मात्र तिने सासरी परतण्यास नकार दिल्याचे समोर आले. घरगुती कारणांवरून दोघांमध्ये मतभेद वाढले होते. ‘शिमगा’ सणाच्या निमित्ताने पत्नी आणि मुलीला घरी आणण्याचा प्रेमचा प्रयत्न अपयशी ठरला. आपल्या लेकीचं तोंड पाहण्याची त्याची तीव्र इच्छा असूनही निराशाच पदरी पडल्याचं कुटुंबीय सांगतात.
शेवटचा संदेश: हताश पती आणि व्याकुळ पित्याचा निरोप
आत्महत्येपूर्वी प्रेमने पत्नीला गोसावी भाषेत दोन ऑडिओ मेसेज पाठवले. त्यामध्ये तो भावूक शब्दांत म्हणतो की,“तू आईचं ऐकतेयस, पण माझ्या शब्दांना मान देत नाहीस. लेकराचं तोंडही दाखवत नाहीस. मी आता या जगात नसणार, पण लेकराला चांगलं सांभाळ, त्याला चांगले संस्कार दे. माझी काही चूक असेल तर पाया पडतो…” हा संदेश एका तुटलेल्या संसाराचं आणि मानसिक ताणाचं विदारक चित्र उभं करतो.
या प्रकरणाची नोंद स्थानिक पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे. या घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

