(मुंबई)
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) मृत व्यक्तींच्या बँक खाते, लॉकर आणि इतर तिजोरीसंबंधी दाव्यांसाठी नवीन नियम जाहीर केले आहेत. दि. 26 सप्टेंबरपासून लागू असलेल्या या नियमांनुसार, मृत ग्राहकांच्या खात्याशी संबंधित दावे 15 दिवसांच्या आत निकाली काढणे बँकेस बंधनकारक आहे, तसेच निधी नामांकित व्यक्ती किंवा उत्तरजीवी कडे वितरीत करणे आवश्यक आहे.
जर बँकेने विलंब केला, तर नामांकित व्यक्तीला भरपाई देखील दिली जाईल. RBI ने सांगितले की हे नियम मृत व्यक्तींच्या दाव्यांची जलद, सातत्यपूर्ण आणि पारदर्शक प्रक्रिया सुनिश्चित करण्यासाठी तयार केले आहेत. तसेच, ग्राहकांना चांगली सेवा देण्यासाठी कागदपत्र प्रक्रिया सुलभ आणि प्रमाणित करण्यात आली असून, हे नियम 31 मार्च 2026 पर्यंत लागू राहतील.
नियम कोणत्या गोष्टींसाठी लागू?
- मृत व्यक्तींच्या ठेवी खात्यांवरील दावे
- लॉकर आणि तिजोरीवरील दावे
- बँकेत ठेवलेल्या इतर तिजोरीवरील दावे
जर खात्यात नामांकन किंवा उत्तरजीवी कलम असेल, तर बँकेला थकबाकीची रक्कम नामांकित व्यक्ती किंवा उत्तरजीवीला द्यावी लागेल.
- सहकारी बँका: 5 लाख रुपयांपर्यंत दावे सोपी प्रक्रिया
- इतर बँका: 15 लाख रुपयांपर्यंत दावे सोपी प्रक्रिया
- त्याहून जास्त रक्कम असल्यास, बँक उत्तराधिकार प्रमाणपत्र किंवा कायदेशीर कागदपत्रे मागू शकते.
लॉकर व तिजोरी दावे
- बँकेने आवश्यक कागदपत्रे मिळाल्यानंतर 15 दिवसांच्या आत दावे निकाली काढणे बंधनकारक
- दावेदाराशी सल्लामसलत करून लॉकर उघडण्याची तारीख ठरवावी
विलंब झाल्यास काय होईल?
- ठेव खात्यावरील दावे: 15 दिवसांच्या आत निपटारा न केल्यास, बँकेला विलंबाचे कारण स्पष्ट करावे लागेल आणि प्रचलित व्याजदर + वार्षिक 4% व्याज द्यावे लागेल.
- लॉकर/तिजोरी दावे: विलंब झाल्यास बँकेला दररोज 5,000 रुपये भरपाई द्यावी लागेल.
RBI ने स्पष्ट केले की, या नियमांचा उद्देश ग्राहकांना सोपी, जलद आणि पारदर्शक सेवा देणे आणि मृत व्यक्तींच्या खात्याशी किंवा लॉकरशी संबंधित दाव्यांमध्ये गैरसोय होऊ नये याची खात्री करणे हा आहे.

