(लंडन / वृत्तसंस्था)
कोंबडी आधी की अंडे, हा शतकानुशतके चर्चेत असलेला प्रश्न आता विज्ञानाने सोडवला असल्याचा दावा करण्यात आला आहे. यूकेमधील शेफील्ड आणि वॉरविक विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी केलेल्या अभ्यासानुसार कोंबडी आधी आली, असे स्पष्ट झाले आहे. या निष्कर्षामागे अंड्याच्या कवचात आढळणारे ओव्होक्लिडिन-17 (OC-17) हे विशिष्ट प्रथिन कारणीभूत आहे.
संशोधकांच्या मते, OC-17 हे प्रथिन फक्त कोंबडीच्या शरीरात तयार होते. अंड्याच्या कवचाच्या निर्मितीत या प्रथिनाची अत्यंत महत्त्वाची भूमिका असते. कॅल्शियम कार्बोनेटपासून अंड्याचे मजबूत कवच तयार होण्यासाठी स्फटिकीकरण प्रक्रियेला हे प्रथिन गती देते. OC-17 शिवाय आधुनिक कोंबडीचे अंडे अस्तित्वात येऊ शकले नसते, असे अभ्यासातून स्पष्ट झाले आहे.
हा अभ्यास केवळ तात्त्विक प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी नव्हता. अंड्याच्या कवचाची निर्मिती प्रक्रिया समजून घेणे हा त्यामागचा मुख्य उद्देश होता. या संशोधनाचा उपयोग भविष्यात मजबूत साहित्य, जैविक संरचना तसेच औषधनिर्मिती क्षेत्रात होऊ शकतो, असे शास्त्रज्ञांनी सांगितले.
या संशोधनासाठी सुपरकॉम्प्युटरचा वापर करण्यात आला. शेफील्ड विद्यापीठाचे डॉ. कॉलिन फ्रीमन यांनी सांगितले की, कोंबडी आधी आली याचा आता ठोस वैज्ञानिक पुरावा उपलब्ध आहे. पहिल्या खऱ्या कोंबडीनेच पहिले खरे अंडे दिले, कारण तिच्या शरीरात OC-17 हे आवश्यक प्रथिन तयार होत होते.
उत्क्रांतीच्या सिद्धांतानुसार अंडी ही संकल्पना फार प्राचीन आहे. डायनासोर आणि अनेक पक्षी लाखो वर्षांपूर्वी अंडी घालत होते. कोंबडीचा उगम लाल जंगलफॉल या जंगली पक्ष्यापासून झाल्याचे मानले जाते. कोंबडीसारख्या दिसणाऱ्या दोन पक्ष्यांच्या मिलनातून झालेल्या अनुवांशिक बदलांमुळे पहिले खरे कोंबडीचे अंडे तयार झाले आणि त्यातूनच पहिली कोंबडी जन्माला आली, असा निष्कर्ष या अभ्यासात मांडण्यात आला आहे.

