(खोपोली)
खोपोली शहरात आज सकाळी घडलेल्या खुनाच्या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. नुकत्याच पार पडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत नवनिर्वाचित नगरसेविका झालेल्या मानसी काळोखे यांच्या पतीची निर्घृण हत्या करण्यात आली. मानसी काळोखे या एकनाथ शिंदे गटाच्या शिवसेनेशी संलग्न आहेत.
नवनिर्वाचित नगरसेविका मानसी काळोखे यांचे पती मंगेश काळोखे यांच्यावर आज सकाळी सुमारे सात वाजण्याच्या सुमारास प्राणघातक हल्ला करण्यात आला. मुलाला शाळेत सोडून घरी परतत असताना त्यांच्यावर हल्लेखोरांनी हल्ला केला. मंगेश काळोखे यांची हत्या करून मृतदेह रस्त्यावर फेकून दिल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. या हत्येचा संबंध नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणुकीतील वादाशी असल्याची चर्चा परिसरात सुरू आहे.
काळ्या रंगाच्या गाडीतून आले हल्लेखोर
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, काळ्या रंगाच्या गाडीतून आलेल्या काही जणांनी हा हल्ला केला. घटनेनंतर आरोपी फरार झाले असून पोलिसांकडून त्यांचा शोध सुरू आहे.
प्रचारात पत्नीच्या पाठीशी होते मंगेश
खोपोली नगरपरिषदेच्या 2025 च्या सार्वत्रिक निवडणुकीचा निकाल 21 डिसेंबर 2025 रोजी जाहीर झाला होता. या निवडणुकीत एकनाथ शिंदे गटाच्या शिवसेनेला चांगला प्रतिसाद मिळाला असून नगराध्यक्षपदी कुलदीप शेंडे निवडून आले. याच निवडणुकीत मानसी काळोखे नगरसेविका म्हणून निवडून आल्या होत्या. संपूर्ण प्रचारादरम्यान त्यांचे पती मंगेश काळोखे हे सावलीसारखे त्यांच्या सोबत होते. प्रचाराच्या काळात काही व्यक्तींशी वाद झाल्याची चर्चा आहे.
मंगेश काळोखे हे माजी नगरसेवक होते. आज, २६ डिसेंबर रोजी सकाळी ते आपल्या मुलाला शाळेत सोडण्यासाठी गेले होते. मात्र घरी परतताना काही अज्ञात व्यक्तींनी त्यांच्यावर हल्ला करून निर्घृणपणे हत्या केली.
प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, हल्लेखोर काळ्या रंगाच्या गाडीतून आले होते. त्यांनी तोंडाला रुमाल बांधले असल्याने त्यांची ओळख पटू शकलेली नाही. हल्ल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाले.
या घटनेनंतर खोपोली शहरात मोठी खळबळ उडाली आहे. निवडणुकांची रणधुमाळी सुरू असतानाच दिवसाढवळ्या घडलेल्या या हत्येमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. हल्ल्यामागील नेमके कारण काय, तसेच हल्लेखोर कोण होते, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
तपासाला वेग
ही हत्या कोणी, कोणाच्या सांगण्यावरून आणि कोणत्या कारणासाठी केली, याचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे. हल्लेखोरांना कोणी मदत केली का, या कटामागे आणखी कोण सहभागी आहेत का, याचाही तपास सुरू आहे. ज्या ठिकाणी मंगेश काळोखे यांचा मृतदेह आढळून आला, त्या परिसरात नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.
मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून, मंगेश काळोखे यांच्या निकटवर्तीयांसह प्रत्यक्षदर्शींचे जबाब नोंदवण्याचे काम सुरू आहे. निवडणूक काळात झालेल्या वादांचा सखोल तपास करूनच हत्येचे नेमके कारण स्पष्ट होणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

