(राजापूर / तुषार पाचलकर)
राजापूर-लांजा-साखरपा मतदारसंघाचे माजी आमदार तसेच शिवसेना पक्षाचे समन्वयक राजन साळवी यांनी लातूर जिल्ह्यातील अतिवृष्टी आणि अवकाळी पावसामुळे झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानीचा आढावा घेतला. लातूर येथे शिवसेना, महिला आघाडी आणि युवासेनेच्या सर्व जिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुख यांची विशेष बैठक घेऊन परिस्थितीची सविस्तर माहिती घेतल्यानंतर आमदार साळवी यांनी जिल्हाधिकारी श्रीमती वर्षा घुगे यांची भेट घेतली.
या बैठकीत त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रमुख समस्या मांडल्या. यामध्ये शेतीचे व जमिनीचे नुकसान, घरांचे आणि जनावरांचे नुकसान, पंचनामे विलंब, तसेच ICICI Lombard पीकविमा कंपनीकडून शेतकऱ्यांना सहकार्य न मिळणे यावर विशेष भर देण्यात आला. अनेक शेतकऱ्यांनी विमा कंपनीकडून नुकसानभरपाई प्रक्रियेत होत असलेल्या गैरप्रकारांविषयी तक्रार केली असल्याचेही साळवी यांनी निदर्शनास आणून दिले.
त्याचप्रमाणे E-KYC प्रणाली बंद पडणे, Farmer ID संबंधित अडचणी, आणि पंचनामे प्रक्रियेत होत असलेली ढिलाई या मुद्द्यांवरही चर्चा केली. जिल्हाधिकारी घुगे यांनी या सर्व समस्यांबाबत सकारात्मक भूमिका घेत शेतकऱ्यांना दिलासा मिळेल असे आश्वस्त केले. शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये म्हणून संबंधित अधिकाऱ्यांना त्यांनी तातडीच्या सूचना दिल्या, तसेच विमा कंपनीला नियमानुसार काम करण्याच्या सूचना देण्यात आल्या त्यांनी स्पष्ट केले.
या बैठकीस शिवसेना जिल्हाप्रमुख सचिन दाणे, शिवाजीराव माने, ॲड. ब्रम्हाजी केंद्रे, महिला जिल्हाप्रमुख जयश्री भुतेकर, अर्चना बिराजदार, युवासेना जिल्हाप्रमुख कुलदीप सूर्यवंशी, विजय कस्पटे, युवराज वंजारे, तसेच तालुकाप्रमुख, तालुका संघटक आणि अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
आमदार राजन साळवी यांनी या भेटीद्वारे शेतकऱ्यांच्या अडचणी तातडीने दूर करण्यासाठी प्रशासनाने ठोस पावले उचलावीत, अशी मागणी केली असून, शेतकऱ्यांचे प्रश्न त्वरीत सुटल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही, असा इशाराही दिला आहे.

