(खेड / रत्नागिरी प्रतिनिधी)
लोटे औद्योगिक वसाहतीतील लक्ष्मी ऑरगॅनिक इंडस्ट्रीजने इटलीमध्ये पर्यावरणीय प्रदूषणप्रकरणी बंदी घालण्यात आलेल्या रासायनिक कंपनीची यंत्रसामग्री, तंत्रज्ञान आणि पेटंट्स वापरात आणल्याचा दावा समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्याने कोकणात तीव्र अस्वस्थता पसरली आहे. या पार्श्वभूमीवर सोमवारी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या (एमपीसीबी) मुंबई येथील मुख्यालयातून सहा वरिष्ठ अधिकाऱ्यांचे पथक लोटे येथे दाखल झाले असून कंपनीच्या कामकाजाची सखोल चौकशी सुरू झाली आहे.
इटलीतील गंभीर पर्यावरणीय प्रदूषणप्रकरणामुळे बंद पडलेली आणि न्यायालयीन कारवाईला सामोरी गेलेली मिटेनी एस. पी. ए. ही रासायनिक कंपनी लक्ष्मी ऑरगॅनिक इंडस्ट्रीजच्या एका उपकंपनीने विकत घेतली असून, त्यातील यंत्रसामग्री व तंत्रज्ञान लोटे येथे वापरात आणल्याचा आरोप गेल्या काही दिवसांपासून समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थांनीही या प्रकरणाची दखल घेतल्याने संशयकल्लोळ अधिक गडद झाला आहे.
लोटे परिसर आधीच औद्योगिक प्रदूषणामुळे संवेदनशील मानला जातो. त्यातच पीएफएएससारख्या दीर्घकालीन परिणाम करणाऱ्या रसायनांचे उत्पादन झाल्यास वाशिष्ठी नदी, भूगर्भातील पाणी तसेच मानवी आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची भीती स्थानिक नागरिक व्यक्त करत आहेत. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने प्रकल्पाला परवानगी देताना कडक अटी घातल्याचा दावा केला असला, तरी इटलीत प्रदूषणास कारणीभूत ठरलेलीच जुनी यंत्रसामग्री येथे वापरली जात असल्याच्या आरोपांमुळे या अटींच्या प्रभावी अंमलबजावणीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
कंपनीने जून महिन्यापासून चाचण्या सुरू केल्या असून, त्यातून निर्माण होणारा टाकाऊ माल जाळण्यासाठी तळोजा येथील प्रकल्पात पाठवण्यात आल्याची माहिती आहे. चार नोव्हेंबर रोजी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी कंपनीला भेट देऊन चाचण्यांचा सविस्तर अहवाल सादर करण्याची नोटीस बजावली होती. हा अहवाल प्राप्त झाल्यानंतर तो तज्ज्ञ समितीकडे पाठवण्यात येणार असून, त्यांच्या निष्कर्षांनंतरच कंपनीबाबत पुढील निर्णय घेतला जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
दरम्यान, लोटे वसाहतीतून तळोजा येथे रासायनिक वेस्ट वाहतूक करणाऱ्या वाहनांनी याआधी कशेडी घाट आणि बोरज धरण परिसरात बेकायदेशीररित्या कचरा टाकल्याच्या घटना घडल्याचा आरोपही समोर आला आहे. कोकणात सीईटीपी आणि घातक कचऱ्याच्या वाहतुकीत वारंवार नियमांचे उल्लंघन होत असताना, सर्व वैधानिक प्रक्रिया प्रत्यक्षात काटेकोरपणे पाळल्या जातील याची खात्री कंपनी कशी देणार, असा सवाल कंपनीचे साईट हेड पाटील यांनी उपस्थित केला आहे.
उद्योगमंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत यांनी या प्रकरणी स्पष्ट भूमिका घेत अहवाल आल्यानंतर आवश्यक ती कारवाई व बंदीचा निर्णय घेतला जाईल, असे संकेत दिले आहेत. मात्र, चौकशी पूर्ण होईपर्यंत परिसरातील नागरिकांमध्ये भविष्यात लोटे औद्योगिक वसाहतीत ‘इटलीची पुनरावृत्ती’ होईल की काय, अशी तीव्र भीती कायम आहे.

