(संगमेश्वर / एजाज पटेल)
डिंगणी ते शास्त्री पूल आंबेड दरम्यान सुरू असलेले गॅस पाईपलाईन भूमिगत करण्याचे काम म्हणजे नागरिकांच्या जीवाशी उघड खेळ सुरू असल्याचे भयावह चित्र सध्या दिसत आहे. कोणतीही सुरक्षा व्यवस्था न करता सुरू असलेल्या बेदरकार खोदाईमुळे हा रस्ता अपघाताचा हॉटस्पॉट बनला असून, ठेकेदाराची मनमानी आणि प्रशासनाचे मौन नागरिकांच्या संतापाला कारण ठरत आहे.
रस्त्यावर खोदून काढलेली माती थेट रस्त्याच्या कडेला ढिगाऱ्यांच्या स्वरूपात टाकण्यात आली आहे. आधीच अरुंद असलेला हा रस्ता त्यामुळे अधिकच धोकादायक बनला असून, दोन्ही बाजूंनी वाहनांच्या रांगा लागत आहेत. या कोंडीतून वाट काढताना वाहनचालकांमध्ये वादावादीचे प्रकार नित्याचेच झाले आहेत.
रात्रीच्या वेळी परिस्थिती अधिकच भीषण होते. ना बॅरिकेड्स, ना रेडियम पट्ट्या, ना सूचना फलक, ना प्रकाश व्यवस्था-अंधारात हा रस्ता म्हणजे थेट मृत्यूचा सापळा आहे. एखादा जीव गेला की प्रशासन हालचाल करणार का? असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.
या साऱ्या प्रकारात भर म्हणजे कामावर असलेल्या ठेकेदाराच्या कामगारांचा उद्धट व उर्मट व्यवहार. वाहनचालक तसेच प्रवाशी जनतेने सुरक्षेबाबत सूचना केल्या असता, बहुसंख्य हिंदी भाषिक कामगारांकडून अरेरावी, उर्मट उत्तरे देण्याचे वर्तन केले जात असल्याची चर्चा परिसरात कायम आहे. स्थानिक भाषेचा अपमान आणि नागरिकांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष केल्यामुळे संताप अधिकच वाढला आहे.
शास्त्री पूल आंबेड ते गणपतीपुळे या पर्यटनदृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या मार्गावर दिवस-रात्र मोठ्या प्रमाणात वाहन वर्दळ असते. अशा ठिकाणी सुरक्षेचा अभाव आणि कामगारांची अरेरावी म्हणजे नागरिकांच्या संयमाची परीक्षा घेण्यासारखे आहे. धक्कादायक बाब म्हणजे, भूमिगत पाईपलाईन टाकण्यासाठी कोणत्या खात्याची परवानगी घेतली आहे, याबाबत विचारणा केली असता ना ठेकेदार स्पष्ट उत्तर देत आहे, ना प्रशासन पुढे येत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडे विचारणा केली असता, ‘हा रस्ता एम.आय.डी.सी कडे वर्ग आहे’ असे सांगून जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न करण्यात आला. म्हणजे अपघात झाल्यावर जबाबदारी कोण घेणार, हा प्रश्न अनुत्तरितच आहे.
फक्त रस्त्याचीच नव्हे, तर रस्त्यालगतच्या डोंगराचीसुद्धा बेकायदेशीर खोदाई सुरू असल्याने भविष्यात भूस्खलनाचा व उभी झाडे आडवी होण्याचा धोका निर्माण केला जात आहे. हे सर्व सुरू असताना संबंधित अधिकारी नेमके कुठे आहेत, असा सवाल उपस्थित होत आहे.
या ठेकेदाराच्या बेफिकिरीमुळे किंवा प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे एखादा गंभीर अपघात झाल्यास, त्याची संपूर्ण जबाबदारी ठेकेदार,आणि संबंधित प्रशासनावरच राहील, असा थेट इशारा स्थानिक ग्रामस्थ व वाहनचालकां कडून देण्यात येत असून.या बाबत वाहन चालक आणि जनता एकत्र येऊन जिल्हाधिकारी यांच्याकडे न्यायासाठी धाव घेणार असल्याचे समजते.

