(गुहागर / सचिन कुळये)
सडे जांभारी येथे बीटस्तरीय हिवाळी क्रीडास्पर्धांचे उद्घाटन व समारोप उत्साहात पार पडले. दि. २२ व २३ डिसेंबर २०२५ रोजी गुहागर बीट आबलोली अंतर्गत कोतळूक, शीर, आबलोली, भातगाव, पाचेरी व पडवे येथील शाळांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता. सडे जांभारी गावाच्या इतिहासात प्रथमच जि. प. पूर्ण प्राथमिक आदर्श शाळा सडे जांभारी नं. २ ने बीटस्तरीय क्रीडास्पर्धांचे यजमानपद भूषवले. स्पर्धांचे यशस्वी आयोजन केल्याबद्दल मुख्याध्यापक संतोष मुंडेकर, शिक्षक उदय गोरीवले, पल्लवी डिंगणकर, पवार तसेच काताळे लोहारवाडी येथील ग्रामस्थांनी उपलब्ध करून दिलेल्या मैदानाबद्दल आयोजकांनी आभार व्यक्त केले.
स्पर्धांचे उद्घाटन सडे जांभारी ग्रामपंचायतीच्या सरपंच वनिता पांडुरंग डिंगणकर यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन व क्रीडाज्योत प्रज्वलन करून करण्यात आले. यावेळी ग्रामस्थ, शिक्षक, पालक आणि क्रीडारसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उद्घाटनप्रसंगी खेळाचे महत्त्व, शिस्त, संघभावना आणि निरोगी जीवनशैली यावर मार्गदर्शन करण्यात आले. विविध शाळांतील खेळाडूंनी मार्चपास्ट व प्रात्यक्षिकांद्वारे कार्यक्रमात रंगत आणली. या स्पर्धांमुळे विद्यार्थ्यांच्या क्रीडागुणांना वाव मिळून ग्रामीण भागातील क्रीडाविकासाला चालना मिळेल, असे मत मान्यवरांनी व्यक्त केले.
स्पर्धा यशस्वी करण्यासाठी ग्रामस्थ व महिला वर्गाने दोन दिवसांची भोजन व्यवस्था उत्तम प्रकारे केली. सडे जांभारीतील देणगीदारांनी आर्थिक व वस्तूरूप सहकार्य केले. तसेच सत्य सेवा मातोश्री ग्रुप क्रमांक १ या मंडळातर्फे सहभागी सर्व शाळांच्या विद्यार्थ्यांना जर्सी-टीशर्ट तर पंचांसाठी टोप्या देण्यात आल्या.
स्पर्धेत आबलोली केंद्र बीटस्तरावर विजयी ठरले. मोठा गट आणि लहान गट, मुलगे व मुली या दोन्ही गटांत भातगाव केंद्राने चॅम्पियनशिप पटकावली.
या क्रीडास्पर्धांच्या यशस्वी आयोजनासाठी आयोजक समिती, शिक्षकवर्ग, स्वयंसेवक आणि ग्रामस्थांनी मोलाचे सहकार्य केले. शेवटी सर्व ग्रामस्थ, महिला मंडळ व क्रीडारसिकांचे आभार मानत स्पर्धेची सांगता करण्यात आली.

