(संगमेश्वर / प्रतिनिधी)
चिपळूण तालुक्यातील डेरवण क्रीडा संकुलात झालेल्या जिल्हास्तरीय शालेय धनुर्विद्या स्पर्धेत भाईशा घोसाळकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयातील तब्बल १२ विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन करत ठसा उमटवला. या यशामुळे आता या विद्यार्थ्यांची सातारा येथे होणाऱ्या विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
१९ वर्षांखालील गटात वेदांती पंडव, ऐश्वर्या उजगावकर, सोहम दहिवलकर व यश भडवळकर यांनी चमकदार कामगिरी केली. तर १७ वर्षांखालील गटात मंजुश्री कडवईकर, स्वरा इंजळे, आयुष ओकटे आणि संग्राम ओकटे यांनी आपली गुणवत्ता सिद्ध केली. १४ वर्षांखालील गटात साईराज सुर्वे, स्वराज चव्हाण, क्षितिज सरमोकादम, परिणीती कांबळे आणि आर्या जोशी यांनी उत्तुंग कामगिरी केली.
या सर्व विद्यार्थ्यांना क्रीडा शिक्षक संतोष साळुंके यांचे मार्गदर्शन लाभले असून सायली कुंभार व भाग्यदेवी चौगुले यांनीही महत्त्वाचे सहकार्य केले. विशेष म्हणजे या खेळासाठी लागणारे साहित्य शाळेच्या १९८१ च्या दहावीच्या माजी विद्यार्थ्यांनी उपलब्ध करून दिले.
विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल अध्यक्ष डॉ. चंद्रकांत यळगुडकर, सचिव वसंत उजगावकर, मुख्याध्यापक शेषेराव अवघडे, शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष मिलिंद चव्हाण यांच्यासह संपूर्ण शिक्षकवर्गाने अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

