(रत्नागिरी / प्रतिनिधी)
मुंबई गोवा महामार्गावरील रत्नागिरी तालुक्यातील हातखंबा येथील अत्यंत धोकादायक उतारावर अखेर भराव करून उताराची तीव्रता कमी करण्यात आल्याने या मार्गावरील अपघाताची टांगती तलवार असलेली वाहतूक काहीशी सुरळीत होण्यास सुरुवात झाली आहे. मात्र, अनेक अपघात आणि एका निष्पाप युवकाच्या मृत्यूनंतरच काम करणाऱ्या ठेकेदार ईगल कंपनीला उशिरा आलेले हे शहाणपण वाहनचालकांच्या संतापाला कारणीभूत ठरत आहे.
या अती धोकादायक उतारावरून उतरताना किंवा चढताना यापूर्वी अनेक गॅस टँकर तसेच अवजड वाहनांचे सलग अपघात झाले होते. यासोबत अनेक वाहतुकीचे ट्रक चढावामध्ये अचानक ॲक्सेल तुटून बंद पडण्याच्या घटना वारंवार घडत होत्या. एका दुर्घटनेत तर मालवाहू ट्रकने मागोमाग धावणाऱ्या तब्बल आठ वाहनांना जोरदार धडक दिली होती. या भीषण अपघातात झरेवाडी येथील एका तरुणाला आपला जीव गमवावा लागला होता. इतकी गंभीर घटना घडूनही ठेकेदार ‘ईगल’ कंपनीकडून तत्काळ उपाययोजना करण्यात आल्या नव्हत्या, ही बाब स्थानिकांसाठी संतापजनक ठरली होती.
दरम्यान, या भागात नव्या पुलाच्या कामालाही संथ गती प्राप्त झाली होती. मात्र अपघातांची मालिका आणि वाढता जनआक्रोश लक्षात आल्यानंतर अखेर कामाला वेग आला. काही दिवसांपूर्वी नव्या पुलावर भराव टाकून काम पूर्ण करण्यात आले असून त्यावरून वाहतूक सुरू करण्यात आली आहे. नव्या पुलामुळे शाळेजवळील जीवघेण्या वळणावरील अपघातांचा धोका मोठ्या प्रमाणात कमी झाला आहे, ही बाब निश्चितच दिलासादायक आहे.
सध्या नव्या पुलाजवळ चौपदरीकरणासाठी भराव टाकून लेअर तयार करण्याचे काम सुरू आहे. हे काम येत्या काही दिवसांत पूर्ण होण्याची शक्यता वर्तवली जात असून, त्यानंतर या मार्गावरील वाहतुकीला कायमस्वरूपी सुरक्षिततेची हमी मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. मात्र, ‘अपघातानंतरची जाग’ ही मानसिकता न बदलता वेळेत उपाययोजना केल्या गेल्या तरच अशा दुर्घटना टाळता येतील, अशी भावना नागरिक व्यक्त करत आहेत.
रस्त्यावरील खडी तातडीने बाजूला करावी…
हातखंबा गावातील व आजूबाजूच्या परिसरातील रहिवाशांना अद्यापही शाळेजवळील जीवघेण्या वळणावरून प्रवास करावा लागत असला तरी या पट्ट्यातील रस्ता उखडून सर्वत्र खडी पसरल्याने ‘खडीचे साम्राज्य’ निर्माण झाले आहे. त्यामुळे विशेषतः दुचाकीस्वारांसाठी हा रस्ता अपघातांना निमंत्रण देणारा ठरत आहे. रस्त्यावरील खडी तातडीने बाजूला करून डांबरीकरण करण्यात आल्यास दुचाकी चालकांना मोठा दिलासा मिळू शकतो, अशी मागणी वाहनचालकांकडून केली जात आहे.

