(संगमेश्वर)
संगमेश्वर रोड रेल्वे स्थानकासाठी हा आठवडा विशेष ठरणार आहे. शुक्रवारी पोरबंदर एक्स्प्रेस आणि शनिवारी जामनगर एक्स्प्रेस या दोन्ही गाड्यांना संगमेश्वर रोड येथे अधिकृत थांबा मिळाल्याने स्थानकावर दोन दिवस उत्सवाचे वातावरण राहणार आहे.
गेल्या अडीच वर्षांपासून सुरू असलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला अखेर यश आले असून, या निर्णयामुळे संगमेश्वर तालुका आणि परिसरातील प्रवाशांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे. गुजरातकडे थेट रेल्वे संपर्क उपलब्ध झाल्याने व्यापारी, विद्यार्थी, नोकरदार आणि चाकरमान्यांची मोठी सोय होणार आहे.
या आनंदोत्सवानिमित्त दोन्ही गाड्यांचे भव्य स्वागत करण्यात येणार असून, स्थानिक लोकप्रतिनिधी, नागरिक, रेल्वेप्रेमी, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार आणि प्रवासी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. फुलांच्या हारांनी सजलेले स्वागत, घोषणाबाजी आणि जल्लोषात हा ऐतिहासिक क्षण साजरा केला जाणार आहे.
शुक्रवार आणि शनिवार हे दिवस संगमेश्वर रेल्वेच्या इतिहासात अभिमानाचे आणि आनंदाचे ठरणार असून, उद्या गुरुवार २६ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी १.३० वाजता संगमेश्वर रोड रेल्वे स्थानकावर उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजक निसर्गरम्य चिपळूण संगमेश्वर (रेल्वे) फेसबुक ग्रुपच्या वतीने करण्यात आले आहे.

