(नांदेड)
नांदेड जिल्ह्यातील मुदखेड तालुक्यात एक धक्कादायक आणि हृदयद्रावक घटना समोर आली असून, एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाल्याने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. जवळा मुरहार गावातील लखे कुटुंबातील आई-वडील घरात मृतावस्थेत आढळले, तर त्यांच्या दोन मुलांनी रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती आहे.
या घटनेत रमेश सोनाजी लखे (वय ५१), राधाबाई रमेश लखे (वय ४५), मोठा मुलगा उमेश रमेश लखे (वय २५) आणि धाकटा मुलगा बजरंग रमेश लखे (वय २२) यांचा मृत्यू झाला आहे.
घटना नेमकी काय?
प्राथमिक माहितीनुसार, उमेश आणि बजरंग या दोन सख्ख्या भावांनी मुगट रेल्वे स्थानक परिसरात धावत्या रेल्वेखाली उडी मारून आत्महत्या केली. ही बाब उघडकीस येत असतानाच, त्यांच्या घरी आई-वडीलही मृतावस्थेत आढळल्याने गावात एकच खळबळ उडाली.
पोलीस तपासात आई-वडील घरातील पलंगावर मृत अवस्थेत आढळून आले. दोघांनी गळफास घेतल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात असून, मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन अहवालानंतर स्पष्ट होणार आहे.
तपास सुरू, संशयाच्या दिशा अनेक
एकाच कुटुंबातील चार जणांचा अशा प्रकारे मृत्यू झाल्याने आत्महत्या की घातपात, याबाबत विविध तर्कवितर्क लावले जात आहेत. काही शक्यतांमध्ये आधी पालकांचा मृत्यू आणि त्यानंतर मुलांची आत्महत्या, किंवा इतर कोणता गुन्हेगारी प्रकार याचा समावेश आहे. मात्र, पोलीस तपास पूर्ण झाल्यानंतरच सत्य समोर येणार आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून, चारही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. सर्व बाजूंनी सखोल तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
दरम्यान, मोठा मुलगा उमेश लखे हा मनसेचा मुदखेड तालुक्याचा माजी उपाध्यक्ष असल्याचे समजते. तो सामाजिक कार्यातही सक्रिय होता. या घटनेमुळे जवळा मुरहार गावात शोककळा पसरली असून, एकाच कुटुंबाचा असा अचानक अंत झाल्याने नागरिकांमध्ये तीव्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

