(देवळे / प्रकाश चाळके)
संगमेश्वर तालुक्यातील कोंडगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्र साखरपा येथे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तथा आरोग्य सभापती विलास चाळके यांच्या अध्यक्षतेखाली जनआरोग्य समितीची पहिली सभा नुकतीच पार पडली. या सभेत आरोग्य विभागाच्या कामकाजाविषयी नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त करत विविध तक्रारी मांडल्या.
आरोग्य केंद्रात आवश्यक सुविधा उपलब्ध असतानाही रुग्णांना तपासण्यांसाठी खाजगी लॅबमध्ये पाठविणे, रुग्णांची तपासणी न करता औषधे देणे, रुग्णांशी असभ्य वर्तन करणे, वेळेवर उपस्थित न राहणे, वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नावाचा गैरवापर करून पूर्वसूचना न देता आरोग्य केंद्र सोडणे, हालचाल नोंदवही न भरणे तसेच रजेचा अर्ज न देता गैरहजर राहणे आदी गंभीर बाबी पत्रकार संतोष पोटफोडे यांनी सभेत मांडल्या.
तसेच, रुग्णवाहिका वेळेवर उपलब्ध होत नसल्याने रुग्णांची गैरसोय होत असल्याचे नेत्रा शिंदे यांनी पुराव्यासह निदर्शनास आणून दिले. दिवसा डॉक्टर उपलब्ध नसल्याने आपत्कालीन सेवांवर परिणाम होत असल्याची तक्रारही यावेळी करण्यात आली.

कोंडगाव ग्रामपंचायत सदस्या हर्षा आठल्ये यांनी प्राथमिक आरोग्य केंद्रात कायमस्वरूपी एमबीबीएस डॉक्टर नियुक्त करावेत तसेच शासनाच्या सर्व वैद्यकीय सेवा रुग्णांना उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी केली. सभेदरम्यान कोंडगावच्या सरपंच धनश्री जोशी यांनीही नागरिकांच्या तक्रारी गांभीर्याने मांडत आरोग्य सेवेतील त्रुटींवर तीव्र नाराजी व्यक्त केली.
यावेळी आरोग्य सभापती विलास चाळके यांनी वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना कडक शब्दांत सुनावत, “रुग्णांच्या सेवेत कोणतीही तडजोड सहन केली जाणार नाही. ज्यांना काम करायचे नसेल त्यांनी येथे थांबू नये. डॉक्टरांनी आपले कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडले नाही तर सर्वसामान्य नागरिकांसाठी दर महिन्याला जनता दरबार भरवण्यात येईल,” असा सज्जड इशारा दिला. आरोग्य केंद्राच्या कामकाजात यापुढे सकारात्मक बदल दिसून येतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
या बैठकीस माजी सभापती जया माने, जिल्हा परिषद सदस्या नेहा माने, सरपंच धनश्री जोशी, तालुका वैद्यकीय अधिकारी गोविंद मोरे, रायभोळे, बापू शेट्ये, केतन दुधाणे, ओंकार कोलते, बापू शिंदे, प्रसाद अपंडकर, अंकुश सुर्वे, अजय सावंत, विलास बेर्डे, अमोल लाड, निधी पंदेरे, नेत्रा शिंदे, हर्षा आठल्ये, लक्ष्मण कदम, संजय सुर्वे, संदीप जोशी, किरबेटच्या सरपंच प्रिया कांबळे तसेच आरोग्य विभागाचे कर्मचारी आणि वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.

