(पुणे)
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (एमपीएससी) घेतल्या जाणाऱ्या वस्तुनिष्ठ बहुपर्यायी परीक्षांच्या उत्तरपत्रिकेत महत्त्वाचे आणि व्यापक बदल करण्यात आले आहेत. यासंबंधीचे अधिकृत प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आले असून, हे सर्व बदल १ मार्च २०२६ नंतर होणाऱ्या सर्व एमपीएससी परीक्षा आणि भरती प्रक्रियांसाठी लागू असणार आहेत.
आयोगाने स्पष्ट केले आहे की, सुधारित नियम आणि नवीन उत्तरपत्रिका पद्धत १ मार्च २०२६ पासून आयोजित केल्या जाणाऱ्या सर्व परीक्षांमध्ये वापरली जाईल. उमेदवारांना मार्गदर्शनासाठी सविस्तर सूचना उत्तरपत्रिकेच्या दुय्यम प्रतीच्या (कार्बनलेस कॉपी) मागील बाजूस देण्यात येणार आहेत.
उत्तरपत्रिकेवर विहित ठिकाणी स्वाक्षरी न करणे, काळ्या बॉल पॉईंट पेनव्यतिरिक्त अन्य पेन वापरणे, अनावश्यक चिन्हे किंवा मजकूर लिहिणे, प्रश्नपुस्तिका क्रमांक नमूद न करणे, उत्तरपत्रिकेवरील डफ कोड किंवा टायमिंग ट्रॅक खराब करणे अशा चुका झाल्यास उत्तरपत्रिका अवैध ठरवली जाईल, असा इशाराही आयोगाने दिला आहे.
काय आहेत उत्तरपत्रिकेतील बदल?
- एमपीएससीनुसार, नवीन उत्तरपत्रिका दोन भागांत विभागलेली असेल.
- भाग-१ केवळ प्रश्नांची उत्तरे नोंदवण्यासाठी वापरली जाईल.
- भाग-२ मध्ये उमेदवाराचे नाव, बैठक क्रमांक, विषय संकेतांक, प्रश्नपत्रिका क्रमांक आणि स्वाक्षरी यासारखा वैयक्तिक तपशील नमूद करावा लागेल.
मूल्यमापन प्रक्रियेत अधिक गोपनीयता
परीक्षा संपल्यानंतर समवेक्षक उत्तरपत्रिकेतील भाग-१ आणि भाग-२ वेगळे करतील. त्यामुळे उत्तरपत्रिकेचे मूल्यमापन करताना उमेदवाराची ओळख उघड होणार नाही आणि मूल्यांकन प्रक्रिया अधिक गोपनीय राहील, असे आयोगाने स्पष्ट केले आहे.
पाचवा पर्याय आता अनिवार्य
या बदलांमधील सर्वात महत्त्वाचा निर्णय म्हणजे चार पर्यायांऐवजी आता प्रत्येक प्रश्नासाठी पाच पर्याय असतील. उमेदवाराला एखाद्या प्रश्नाचे उत्तर माहीत नसेल, तरी पाचवा पर्याय निवडणे बंधनकारक असेल. प्रत्येक प्रश्नासाठी पाच पैकी एक तरी वर्तुळ छायांकित करणे आवश्यक आहे. कोणताही पर्याय न निवडल्यास त्या प्रश्नासाठी २५ टक्के म्हणजेच १/४ गुण वजा केले जातील.
बैठक क्रमांकात बदल
आतापर्यंत ८ अंकी असलेला बैठक क्रमांक आता ७ अंकी असेल. हा बैठक क्रमांक संबंधित जाहिरातीच्या संपूर्ण भरती प्रक्रियेसाठी कायमस्वरूपी राहणार आहे.
नेगेटिव्ह मार्किंगचे नियम अधिक कडक
चुकीचे उत्तर देणे, कोणताही पर्याय न निवडणे, एकापेक्षा जास्त वर्तुळे छायांकित करणे, उत्तरात खाडाखोड किंवा दुरुस्ती करण्याचा प्रयत्न करणे अशा प्रत्येक प्रकरणात त्या प्रश्नासाठी २५ टक्के किंवा १/४ गुण वजा केले जाणार आहेत. तसेच गुणांची बेरीज अपूर्णांकात आली तरी ती जशीच्या तशी ग्राह्य धरली जाणार असल्याचेही आयोगाने स्पष्ट केले आहे.
नवीन उत्तरपत्रिका पद्धतीमुळे एमपीएससी परीक्षांमधील पारदर्शकता आणि शिस्त वाढेल, असा आयोगाचा दावा आहे.

