(राजापूर / तुषार पाचलकर)
राजापूर तालुक्यातील पाचल पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाच्या सरस्वती विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालय, पाचल येथील आजिवली, जवळेथर व मिळंद परिसरातील सुमारे ४० ते ५० विद्यार्थी दररोज एसटी बसने शाळेत ये-जा करतात. मात्र राजापूर आगारातून दुपारी ३.३० वाजताची राजापूर–आजिवली शालेय बसफेरी कधी बंद तर कधी सुरू ठेवली जात असल्याने विद्यार्थ्यांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
या फेऱ्यांचे ठोस नियोजन नसल्यामुळे विद्यार्थ्यांना रत्नागिरी–आजिवली सायंकाळी ६.१५ वाजताच्या बसने प्रवास करावा लागतो. ही बस अनेकदा वेळेवर न आल्याने विद्यार्थी उशिरा घरी पोहोचतात, असे पालक व शाळा प्रशासनाने सांगितले. परिणामी बसथांब्यापासून घरापर्यंतचा प्रवास रात्री करावा लागत असल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे.
या संदर्भात शाळा प्रशासनाने राजापूर आगार व्यवस्थापकांना वारंवार लेखी स्वरूपात कळवूनही अद्याप ठोस निर्णय झालेला नाही. शालेय बसफेरी बंद ठेवल्यास विद्यार्थ्यांच्या प्रवासादरम्यान उद्भवणाऱ्या संभाव्य दुर्घटनांची जबाबदारी संबंधितांवर राहील, असेही पत्रात स्पष्ट करण्यात आले आहे.
विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी आणि त्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने राजापूर–आजिवली शालेय बसफेरी कोणत्याही परिस्थितीत बंद करू नये, अशी ठाम मागणी सरस्वती विद्यामंदिर, पाचलचे मुख्याध्यापकांनी केली आहे.

