(देवळे /प्रकाश चाळके)
वादळी वाऱ्यामुळे नुकसान झालेल्या गोरगरिबांच्या घरांच्या पुनर्बांधणीसाठी लागणाऱ्या वाळूच्या प्रश्नावर आमदार किरण उर्फ भैय्या सामंत यांनी स्पष्ट आणि ठाम भूमिका मांडली आहे. “गोरगरिबांनी घरकुलासाठी फाटी-फाटी, घमेली-घमेली वाळू नेली आणि त्यासाठी प्रशासनाने दंड केला, तर तो दंड मी स्वतः भरेन. हे मी पुण्यकर्म समजेन,” असे वक्तव्य त्यांनी एका खाजगी वृत्तवाहिनीशी बोलताना केले.
जैतापूर परिसरातील वाळू उपशाबाबत उपस्थित करण्यात आलेल्या प्रश्नाला उत्तर देताना आ. भैय्या सामंत यांनी सामान्य जनतेची बाजू घेतली. सध्या पावसाळा तोंडावर आला असून अनेक गोरगरीब कुटुंबांची घरे वादळी वाऱ्यामुळे पडली आहेत. मात्र घरकुल बांधण्यासाठी आवश्यक वाळू उपलब्ध होत नसल्याने अनेकांचे बांधकाम रखडले आहे, असे त्यांनी सांगितले.
“सामान्य माणसाच्या मूलभूत गरजा महत्त्वाच्या आहेत. घर बांधण्यासाठी लागणारी थोडीफार वाळू घेतल्यामुळे जर प्रशासनाकडून दंड आकारला गेला, तर तो दंड मी भरण्यास तयार आहे. मी नेहमीच सामान्य जनतेच्या पाठीशी ठामपणे उभा आहे,” असेही त्यांनी स्पष्ट केले.
आ. भैय्या सामंत यांच्या या भूमिकेचे राजापूर-लांजा-साखरपा मतदारसंघात स्वागत होत आहे. सोशल मीडियावर “आमचा आमदार, कामगिरी दमदार” तसेच “आपला हक्काचा माणूस” अशा प्रतिक्रिया आणि पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.
गोरगरिबांच्या घरकुलाच्या प्रश्नावर घेतलेल्या या आक्रमक भूमिकेमुळे आमदार किरण सामंत पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.

