(रत्नागिरी)
रत्नागिरी सिटी बॅडमिंटन असोसिएशनच्या वतीने ९ ते १९ वर्षे वयोगटातील मुला-मुलींसाठी आयोजित जिल्हास्तरीय खुल्या ज्युनिअर बॅडमिंटन स्पर्धेत उत्कृष्ट खेळ पाहायला मिळाला. १९ वर्षांखालील गटात आर्यन वेल्हाळ आणि नेहा मुळ्ये यांनी प्रभावी कामगिरी करत विजेतेपद पटकावले.
या स्पर्धेत विविध वयोगटांतील खेळाडूंनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. १७ वर्षांखालील मुलींमध्ये नेहा मुळ्ये, तर १७ वर्षांखालील मुलांमध्ये आर्यन वेल्हाळ यांनी प्रथम क्रमांक मिळवला. १५ वर्षांखालील मुलींमध्ये रिया पेढामकर, तर मुलांमध्ये समर्थ पवार विजेते ठरले. १३ वर्षांखालील गटात मुलींमध्ये विश्वा गमरे आणि मुलांमध्ये समर्थ पवार यांनी बाजी मारली. ११ वर्षांखालील मुलींमध्ये वल्लरी देवस्थळी, तर मुलांमध्ये अभिराज पवार विजेते ठरले. ९ वर्षांखालील गटात मुलींमध्ये शार्वी साळुंखे आणि मुलांमध्ये अभिराज पवार यांनी प्रथम क्रमांक पटकावला.
सर्व विजेत्या आणि उपविजेत्या खेळाडूंना ट्रॉफी देऊन गौरवण्यात आले. बक्षीस वितरण समारंभाच्या अध्यक्षस्थानी रत्नागिरी सिटी बॅडमिंटन असोसिएशनचे अध्यक्ष प्रसन्न आंबुलकर होते. यावेळी अमित मुळ्ये, सुधीर बाष्टे, सरोज सावंत आणि सीताराम सावंत उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रत्नागिरी जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनचे सचिव रजनीष महागांवकर यांनी केले.
अध्यक्षीय भाषणात प्रसन्न आंबुलकर यांनी स्पर्धेला मिळालेल्या चांगल्या प्रतिसादाबद्दल खेळाडू, पालक आणि प्रशिक्षकांचे आभार मानले. राज्य व राष्ट्रीय स्तरावरील खेळाडू घडवण्यासाठी अशा स्पर्धात्मक संधी सातत्याने मिळणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. भविष्यातही होतकरू खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी अशा स्पर्धांचे आयोजन सुरू ठेवण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

