(रत्नागिरी / प्रतिनिधी)
मतदान प्रक्रियेच्या विश्वासार्हतेचा कणा मानल्या जाणाऱ्या इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांमध्ये (ईव्हीएम) वारंवार बिघाड होण्याचे प्रकार समोर येत असताना, निवडणूक प्रशासनाच्या तयारीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. हातखंबा मतदान केंद्रावर सकाळी व दुपारी अशा दोन्ही सत्रांत मशीनमध्ये बिघाड झाल्याचा प्रकार घडला. यामुळे मतदान प्रक्रिया वारंवार ठप्प झाली आणि मतदारांना अनावश्यक मनस्ताप सहन करावा लागला आहे.
विशेष म्हणजे, सकाळच्या सुमारासही मशीनमध्ये बिघाड झाल्याची माहिती समोर आली आहे. त्या वेळीही मशीन तपासून पाहण्यात आली होती. दोष दूर होत नसल्याने मशीन बदली करण्यात आली. दरम्यान दुपारच्या सुमारास ही दुसऱ्या खोलीतील मशीन बिघडल्याचा प्रकार घडला. मशीनचे बटण दाबल्यानंतर लाल सिग्नल लागूनच राहिला. व दोन्ही मत दिल्यानंतरही मशीन मधून आवाज आला नाही. दोन तीन वेळेस बटन प्रेस केल्यावरही सिग्नल जात न्हवता. त्यानंतर केंद्रप्रमुख समीर गडबडे , तलाठी सौरभ जाधव यांनी देखील मशीन बिघाडाचा दोष दूर करण्याचा प्रयत्न केला. मात्र दोष दूर होत नसल्याचे समजताच अखेर केंद्रप्रमुख समीर गडबडे, तलाठी सौरभ जाधव यांच्याकडून संबंधित मशीन बदलण्याचा निर्णय घेण्यात आला.
पत्रकार कांबळे यांच्या समोरच नवीन मशीन बसवण्यात आले. या प्रक्रियेमुळे मतदानात सुमारे पंधरा ते वीस मिनिटांचा खंड पडला होता. या कालावधीत मतदानासाठी आलेल्या मतदारांना प्रतीक्षा करावी लागली. वारंवार बिघाड होत असल्याने मतदारांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण होत आहे. मतदान यंत्रे दोन-तीन वेळा तपासूनही दोष दूर न होणे आणि अखेर मशीन बदलण्याची वेळ येणे, हे प्रशासनाच्या नियोजनातील ढिसाळपणाचेच द्योतक असल्याची भावना मतदारांमध्ये व्यक्त होत आहे. मशीन बदलण्याच्या प्रक्रियेत पंधरा ते वीस मिनिटांचा वेळ वाया गेला. या कालावधीत मतदानासाठी आलेले नागरिक ताटकळत उभे राहिले.
हा संपूर्ण प्रकार पत्रकार कांबळे यांच्यासमोरच घडल्याने त्यांनी गंभीर दखल घेत जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांच्याशी संपर्क साधून घडलेला सर्व घटनाक्रम त्यांच्या निदर्शनास आणून दिला. “मतदानाच्या दिवशीच अशा स्वरूपाचे ईव्हीएम बिघाड कसे घडतात? आधीच यंत्रांची चाचणी झाली असेल तर वारंवार दोष कसा राहतो?” असा थेट आणि रोखठोक सवाल कांबळे यांनी आता उपस्थित केला आहे. दरम्यान, पर्यायी मशीन बसवून मतदान प्रक्रिया पुन्हा सुरू करण्यात आली असली, तरी निवडणूक यंत्रणेच्या पूर्वतयारीचा फज्जा उडाल्याची चर्चा मतदारांमध्ये सुरू आहे. जबाबदारी निश्चित कोणाची, हा प्रश्न देखील अद्याप अनुत्तरितच आहे.
वारंवार होणाऱ्या तांत्रिक अडचणींमुळे मतदान प्रक्रियेच्या सुरळीततेबाबत प्रश्न उपस्थित होत असून मतदारांना अनावश्यक मनस्ताप सहन करावा लागत असल्याची भावना व्यक्त होत आहे. दरम्यान, निवडणूक प्रशासनाने तातडीने पर्यायी ईव्हीएम उपलब्ध करून देत मतदान प्रक्रिया पुन्हा सुरू केली असली तरी मात्र, सकाळपासूनच तांत्रिक बिघाडाचे प्रकार घडत असल्याने निवडणूक यंत्रणेच्या तयारीवर चर्चा सुरू झाली आहे.
लोकशाहीचा सर्वात महत्त्वाचा उत्सव असलेल्या निवडणुकीत अशा तांत्रिक त्रुटी वारंवार घडत असतील, तर मतदारांनी मतदान प्रक्रियेवर विश्वास कसा ठेवायचा, असा प्रश्न उपस्थित होत आहे. ‘ईव्हीएम सुरक्षित आहेत’ असे ठाम दावे करणाऱ्या प्रशासनाने प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी मात्र मतदारांना संभ्रमात टाकल्याचे चित्र येथे दिसून आले.

