(रत्नागिरी)
अणुऊर्जेचा समाजहितासाठी होणारा उपयोग आणि त्याविषयी जनजागृती करण्याच्या उद्देशाने न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (एनपीसीआयएल) तर्फे राबवण्यात येणाऱ्या ‘अॅटम ऑन व्हील्स’ या विशेष मोहिमेअंतर्गत एक मोबाइल प्रदर्शन 11 मार्च 2025 रोजी रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणातून शुभारंभ करण्यात आला होता. या वेळी एक विशेष सज्ज बस मान्यवरांच्या उपस्थितीत रवाना करण्यात आली होती.
मार्च व एप्रिल 2025 या कालावधीत या बसने 65 गावांचा दौरा करून 15,351 नागरिकांपर्यंत अणुऊर्जेच्या विविध उपयोगांविषयी माहिती पोहोचवली. प्रदर्शनासाठी पॅनल्स, एलईडी टीव्ही, ऑडिओ-व्हिडिओ प्रोजेक्शन सिस्टीम, माहितीपुस्तिका (पंफ्लेट्स) यांचा प्रभावी वापर करण्यात आला.
12 एप्रिल ते 11 मे 2025 या कालावधीत बसने आणखी 48 गावांमधील 9,746 लोकांपर्यंत पोहोचत अणुऊर्जेसंदर्भातील माहिती व शंका निरसन केले. आतापर्यंत या उपक्रमाच्या माध्यमातून एकूण 113 गावांतील 25,097 नागरिकांना अणुऊर्जेच्या विविध पैलूंविषयी जागरूक करण्यात आले आहे.
या मोहिमेदरम्यान शाळांमधील विद्यार्थी, महिला, युवक, ग्रामपंचायत सदस्य, स्थानिक नागरिक तसेच रुग्णालये व इतर संस्थांतील कर्मचारी वर्ग यांचा विशेष सहभाग होता. या प्रदर्शनादरम्यान अणुऊर्जेच्या वैज्ञानिक आणि सुरक्षिततेशी संबंधित शैक्षणिक व अॅनिमेशन चित्रपट दाखवण्यात आले. तसेच आकर्षक आणि सर्जनशील माहितीपत्रकांद्वारे विषय अधिक सोप्या भाषेत नागरिकांपर्यंत पोहोचवण्यात आला.
या मोबाइल बससोबत असलेल्या अधिकाऱ्यांनी नागरिकांच्या मनातील अणुऊर्जेसंदर्भातील शंका, उत्सुकता आणि गैरसमज दूर करण्यासाठी संवाद साधत विशेष प्रयत्न केले..पुढील दोन महिन्यांत ‘अॅटम ऑन व्हील्स’ बस रत्नागिरी जिल्ह्याच्या उर्वरित भागांसह सिंधुदुर्ग जिल्ह्यातही जाऊन अनेक गावांतील हजारो नागरिकांपर्यंत पोहोचत अणुऊर्जेबाबत जनजागृती करण्यात येणार आहे.