(चिपळूण)
परमेश्वराचे ठायी चित्त स्थिर होण्यास भजन, कीर्तन, हरिपाठ या सारखे अन्य साधन नाही. भजन कीर्तनामुळे दिवसेनदिवस श्रद्धा बळकट होऊन भक्तांचे मन हरिनामात रमू लागते व संसाराची झळ कमी होऊन मन प्रसन्न राहते व खऱ्या सुखाचे अनुभव येवू लागतात असे संताचे सांगणे आहे. म्हणूनच रूढी- परंपरेनुसार शतक पार करणाऱ्या श्री क्षेत्र टेरव येथील हनुमान मंदिरात पौष शु. पंचमी शके १९४७ गुरुवार दिनांक २५ डिसेंबर,२०२५ रोजी सकाळी घटस्थापना करून विधिवत वीणापूजन करून वीणा चढवून हरिनाम सप्ताहाच्या या आनंद सोहळ्याचा प्रारंभ करण्यात येणार आहे.
वारकरी सांप्रदायाच्या परंपरेनुसार काकड आरती, संध्याकाळी हरिपाठ व त्या नंतर नामांकित किर्तनकारांच्या किर्तनाचे तसेच महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच रात्रौ हरी जागर करण्यात येईल. हरिनाम सप्ताहच्या या कार्यक्रमात समस्त ग्रामस्थ-भाविक आनंदाने सहभागी होऊन अखंड सेवा अर्पण करणार आहेत. सप्ताहाची सांगता पौष शु. (द्वादशी) गुरूवार दिनांक १ जानेवारी, २०२६ रोजी सकाळी काल्याच्या कीर्तनाने करण्यात येईल, तसेच दुपारी १२.०० ते १.०० या वेळेत हंडी फोडून काला करण्यात येईल व घट हालवून विधीवत पूजा करून वीणा उतरविला जाईल. काल्याचे कीर्तन झाल्यावर दुपारी १.०० ते ३.०० या वेळेत महाप्रसादाचे आयोजन करण्यात येईल.
अखंड हरिनाम सप्ताहात जात – पात, गरीब – श्रीमंत असा भेदभाव न करता फक्त आणि फक्त भक्तिभाव जपला जातो आणि हाच भक्तीभाव प्रत्येकाला जगण्यासाठी ऊर्जा देत असतो, त्यामुळे अशा धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करून समाजप्रबोधन होणे ही काळजी गरज आहे असे मत अनेक कीर्तनकार मांडत असतात. तरी सर्व ग्रामस्थ, भाविक, बंधू-भगिनीनी या उत्सवात सहभागी होऊन नामज्ञान यज्ञाचा लाभ घ्यावा अशी विनंती समस्त ग्रामस्थांतर्फे करण्यात आली आहे.

