(रत्नागिरी)
जिल्ह्यातील भूमी अभिलेख विभागाच्या कार्यालयात तीन महिन्यांवरील प्रलंबित असलेल्या जमीन मोजणी प्रकरणांचा निपटारा करण्यासाठी १०, ११, १७ व १८ जानेवारी रोजी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. पावसाळ्यात काम होऊ न शकल्याने जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख रत्नागिरी कार्यालयाच्या अधीनस्थ कार्यालयात माहे ऑक्टोबर अखेरील १२११ मोजणी प्रकरणे प्रलंबित आहेत. त्यापैकी ५१२ मोजणी प्रकरणे मोजणी पूर्ण होऊन कार्यालयीन कामावर प्रलंबित असून उर्वरित प्रकरणांपैकी १०२ मोजणी प्रकरणे वरील नमूद सुट्टीचे दिवशी कार्यालयातील उपलब्ध भूकरमापकांमार्फत निपटारा करण्यात येणार आहे. ज्यासाठी ५१ भूकरमापक सहभागी होतील, अशी माहिती जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख सचिन इंगळी यांनी दिली.
या विशेष मोहिमेमुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळून मोजणी प्रकरणांचा निपटारा जलदगतीने होणार आहे. या मोजणी प्रकरणांचा निपटारा जलदगतीने करण्यासाठी जमाबंदी आयुक्त आणि संचालक, भूमी अभिलेख (म. राज्य) पुणे सुहास दिवसे यांच्या निर्देशानुसार व उपसंचालक भूमी अभिलेख, कोंकण प्रदेश, मुंबई अनिल माने यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख यांच्याकडून या प्रलंबित मोजणी प्रकरणांचा निपटारा करण्यासाठी ही विशेष मोहीम राबविली जात आहे.
यातील १२११ मोजणी प्रकरणे मुदतबाह्य झालेली असून, तीन महिन्यांपेक्षा जास्त कालावधीवर प्रलंबित आहेत. यापैकी ५१२ प्रकरणांत मोजणी पूर्ण झालेली असून, ६०४ प्रकरणांच्या मोजणी तारखा जानेवारी, फेब्रुवारी व मार्च महिन्यात लावण्यात आलेल्या आहेत. उर्वरित ९५ मुदतबाह्य मोजणी प्रकरणांना अद्याप मोजणी तारीख मिळण्यावर शिल्लक असून, सदर प्रलंबित प्रकरणांचा निपटारा करण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे.
या मोहिमेअंतर्गत नमूद सुट्टीच्या दिवसात मोठ्या प्रमाणात निपटारा होणार असल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. यासाठी इतर तालुक्यातील ५१ सर्वेअर यांना बोलावून मोहीम यशस्वी केली जाणार आहे.
पक्षकारांनी विशेष मोहिमेचा लाभ घ्यावा
या मोहिमेअंतर्गत १०२ मोजणी प्रकरणे १०, ११, १७ व १८ जानेवारी या शासकीय सुट्टीच्या दिवशी मोजणी करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या सर्व प्रकरणांत मोजणीच्या नोटीस सर्व संबंधितांना पाठविण्यात आल्या असून, संबंधित अर्जदार व हितसंबंधित यांना दूरध्वनीद्वारे संपर्क साधला असून, अर्जदार यांनी उपस्थित राहून आपल्या जमिनींची मोजणी करून विशेष मोहिमेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख श्री. इंगळी यांनी केले आहे.

